एक्झिट पोल का फसतात? लोकांकडून दिशाभूल करणारी माहिती मिळणे ही एक महत्त्वाची समस्या
By मनोज गडनीस | Published: March 20, 2024 06:49 AM2024-03-20T06:49:38+5:302024-03-20T06:50:10+5:30
निवडणुकीचा हंगाम आला की, एक्झिट पोलची चर्चा आवर्जून होते
मनोज गडनीस, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: निवडणुकीचा हंगाम आला की, एक्झिट पोलची चर्चा आवर्जून होते. मात्र, गेल्या काही वर्षांत अनेक एक्झिट पोल फसल्यामुळे आता ही सर्वेक्षणे लोकांच्या चेष्टेचाही विषय झाली आहेत. परंतु, सखोल सर्वेक्षण न होणे, सर्वेक्षणादरम्यान लोकांकडून दिशाभूल करणारी माहिती मिळणे, सर्वेक्षणासाठी शास्त्रशुद्ध अभ्यास पद्धतीचा अभाव या आणि अशा कारणांमुळे ही सर्वेक्षणे फसत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
सर्वेक्षणाचा अभ्यास करणाऱ्या संजय वाकचौरे यांनी सांगितले, की आपल्याकडे सर्वांत मोठी समस्या आहे लोकांकडून दिल्या जाणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या माहितीची. अनेकवेळा स्थानिक पातळीवरील राजकारणाचा प्रभाव व दबाव यामुळे लोक सर्रास खोटी माहिती देतात. त्याचा मोठा परिणाम हा सर्वेक्षणाचे निकाल चुकण्यावर होतो. सर्वेक्षणामध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सर्वेक्षणासाठी निश्चित करण्यात येणारे सॅम्पल साईज. अशा एक्झिट पोलसाठी सर्वेक्षण करताना ते सर्वंकष असावे लागते.
राजकीय घडामोडींचे अभ्यासक दिनेश रामस्वामी म्हणाले की, आपल्याकडे रेकॉर्ड जपणे ही एक मोठी समस्या आहे. ऐतिहासिक अशा डेटाचा आपल्याकडे तुटवडा आहे. तसेच, सर्वेक्षणासाठी जी शास्त्रीय पद्धती निश्चित आहे, त्याची किती माहिती सर्वेक्षण करणाऱ्या लोकांना आहे हेदेखील महत्त्वाचे आहे.
अलीकडच्या काळात लहान - मोठ्या पक्षांतर्फेदेखील सर्वेक्षण केले जाते. मात्र, त्याकरिता आवश्यक शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करावा लागतो, ती काहीशी खर्चिक बाब असते. त्यामुळे थोड्याशा खर्चात अंदाज येण्यापुरते सर्वेक्षण करण्याकडे लोकांचा कल असतो. पण, त्यामुळेही सर्वेक्षणाचे निकाल चुकतात.
आर्थिक, सामाजिक स्तर आणि वयोगट महत्त्वाचे
- भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात असे सर्वेक्षण करणे हे आव्हानात्मक आहे. कारण सर्वेक्षणात समाजातील सर्व आर्थिक, सामाजिक स्तरातील, सर्व वयोगटातील, महिला व पुरुषांचा सहभाग हवा.
- केवळ एवढेच नव्हे, तर आपल्याकडे प्रांतनिहाय विषय व समस्या वेगळ्या आहेत. जात व धर्माचे निकषदेखील मतदानावर प्रभाव टाकतात.
- त्यामुळे सर्वेक्षणासाठी जेव्हा सॅम्पल साइज तयार केला जातो, त्यावेळी हे मुद्देदेखील विचारात घेणे गरजेचे आहे. सॅम्पल साइजमध्ये हे प्रमाण जर नीट सांभाळले गेले नाही तर त्याचा मोठा फटका सर्वेक्षणाचे निकाल चुकण्यात होतो.
सॅम्पल साइज आणि महिलांचे प्रमाण
सर्वेक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या सॅम्पल साइजमध्ये महिलांचे प्रमाण २५ ते ३० टक्के एवढेच असते. देशातील लोकसंख्येत महिलांची लोकसंख्या ज्या प्रमाणात आहे, त्या प्रमाणात जरी सर्वेक्षणात महिलांच्या संख्येचे प्रमाण जपले तरीदेखील सर्वेक्षणाचे निकाल अनुकूल प्राप्त होऊ शकतात.