आधी नोटीस, नंतर उचलबांगडी! HAS अधिकारी ओशिन शर्मा का आल्या इतक्या चर्चेत?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 03:05 PM2024-09-15T15:05:23+5:302024-09-15T15:05:50+5:30

OShin Sharma HAS :राज्य सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनलेल्या ओशिन शर्मा यांना सोशल मीडियावरील सक्रियता भोवली आहे. त्याच्या अधिकार क्षेत्रास प्रशासकीय कामे प्रलंबित असल्याचे आढळून आल्यानं त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.

Why is HAS officer Oshin Sharma in so much controversy? | आधी नोटीस, नंतर उचलबांगडी! HAS अधिकारी ओशिन शर्मा का आल्या इतक्या चर्चेत?

आधी नोटीस, नंतर उचलबांगडी! HAS अधिकारी ओशिन शर्मा का आल्या इतक्या चर्चेत?

Oshin Sharma News HAS : सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या HAS अधिकारी ओशिन शर्मा यांना सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा नाद महागात पडला आहे. सोशल मीडियावर पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या शर्मा यांची राज्य सरकारकडून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यालयात अनेक कामे प्रलंबित पडलेली असल्याचे आढळून आल्यानंतर सरकारने त्यांची बदली केली. महत्त्वाचे म्हणजे त्याची कोणत्याही पदावर नियुक्ती करण्यात आलेली नाही. 

हिमाचल प्रदेश प्रशासकीय सेवा अधिकारी असलेल्या ओशिन शर्मा या संधोल येथे तहसीलदार म्हणून कार्यरत होत्या. त्यांना काही दिवसांपूर्वी धर्मपूरचे उपविभागीय अधिकारी जोगिंदर पटियाल यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. 

ओशिन शर्मा यांच्याकडील अनेक कामे प्रलंबित

मंडीचे विभागीय आयुक्त अपूर्व देवगन यांनी त्यांच्या कामाचा आढावा घेतला. त्यात असे आढळून आले की, ओशिन यांच्याकडून प्रशासकीय कामे वेळेत केली जात नाहीत. त्याचा सर्वसामान्य नागरिकांना फटका बसत आहे. त्यानंतर एसडीएमला कारवाई करण्याचे आदेश दिले गेले होते. त्यांच्या कार्यक्षेत्रातील अनेक कामे प्रलंबित असल्याचे आढाव्यात आढळून आले. त्यानंतर सरकारकडून ओशिन शर्मा यांची बदली करण्यात आली. 

ओशिन शर्मा या तहसीलदार पदावर होत्या. त्यांची बदली करताना त्यांना कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. डिपार्टमेंट ऑफ पर्सनल मध्ये रिपोर्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स

ओशिन शर्मा या सोशल मीडियावर सक्रिय असतात. फेसबुकवर त्यांचे अडीच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. एक्स (ट्विटर) प्लॅटफॉर्म जवळपास दोन लाख, तर युट्यूबवर ६० हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांना कामातील दिरंगाईबद्दल नोटीस बजावण्यात आली. तेव्हापासून त्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. 

कोण आहेत ओशिन शर्मा?

ओशिन शर्मा या मूळच्या चंबा जिल्ह्यातील भरमौरच्या रहिवाशी आहेत. त्यांचे वडील धर्मशाळा येथे कार्यरत होते. त्यामुळे त्यांचे कुटुंब इथे स्थायिक झाले. २५ एप्रिल २०२१ मध्ये ओशिन शर्मा यांचा विवाह धर्मशाळा येथील त्यावेळचे भाजपचे आमदार विशाल नेहरिया यांच्यासोबत झाला. मात्र, विशाल यांच्यावर त्यांनी मारहाण आणि छळ केल्याचे आरोप केले होते. त्यानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. 

पंजाब विद्यापीठात रसायन शास्त्रात पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण त्यांनी घेतले आहे. त्यांना डॉक्टर व्हायचे होते. काही काळ विद्यार्थी राजकारणातही त्यांनी काम केले. नंतर युपीएससी परीक्षा दिली, पण अपयश आले. त्यानंतर ओशिन शर्मा यांनी हिमाचल प्रदेश प्रशासकीय सेवा परीक्षा दिली. २०१९ मध्ये त्यांची निवडझाली आणि बीडीओ म्हणून त्यांना पहिली पोस्टिंग मिळाली होती. 

Web Title: Why is HAS officer Oshin Sharma in so much controversy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.