कंडोमच्या वापरात भारत मागे का?; राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून वास्तव उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 05:39 AM2022-07-03T05:39:41+5:302022-07-03T05:40:10+5:30
देशातील 36 राज्ये, केंद्रशासित प्रदेशांपैकी 23 राज्यांत कंडोमचा वापर अवघा 10% देखील नाही. पुरुषप्रधान मानसिकतेमुळे त्याचा सर्वाधिक त्रास महिलांना होतो.
समीर परांजपे, मुख्य उपसंपादक
भारतात १० पुरुषांपैकी फक्त एक जण कंडोमचा वापर करतो व गर्भधारणा टाळण्यासाठी १० महिलांपैकी चार जणी नसबंदी करून घेतात असा निष्कर्ष २०१९ ते २०२१ या कालावधीसाठी केलेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून (एनएचएफएस) काढण्यात आला. त्यावरून भारतीय पुरुष लैंगिक संबंधांमध्ये आवश्यक काळजी घेण्याबाबत, तसेच आपल्या व जीवनसाथीच्या शारिरिक, आरोग्याबाबत किती निष्काळजी आहेत हे दिसून येते. त्या तुलनेत भारतीय महिला स्वत:च्या आरोग्याबाबत अधिक जागृत आहे असे म्हणावे लागेल. ९.५ टक्के पुरुष कंडोमचा वापर करतात तर ३७.९ टक्के महिला नसबंदीची शस्त्रक्रिया करून घेतात. शहरांमध्ये हे प्रमाण ग्रामीण भागांपेक्षा जास्त आहे.
सर्वाधिक वापर उत्तराखंडमध्ये
देशातील ३६ राज्ये, केंद्रशासित प्रदेशांपैकी २३ राज्यांत कंडोमचा वापर अवघा १० टक्के देखील नाही. राज्यांपैकी कंडोमचा सर्वाधिक वापर उत्तराखंडमध्ये (२५ टक्के) व केंद्रशासित प्रदेशांत चंदीगढमध्ये (३१.१ टक्के) होतो. २०१५-१६ व २०१९-२१ या दोन कालावधीतील निष्कर्ष पाहिले तर कंडोम वापरण्याचे प्रमाण निराशाजनक आहे.
पुरुषप्रधान मानसिकतेचा फटका
कंडोम वापरल्याने एड्ससारखे विकार व इतर आरोग्य समस्यांना दूर ठेवता येते याबद्दल लोकांमध्ये खूप जागृती झालेली नाही. त्याशिवाय आपल्या समाजातील पुरुषप्रधान मानसिकता लैंगिक संबंध राखण्यामध्येही डोकावते. त्यामुळे कंडोमचा वापर करणे टाळले जाते. कंडोममुळे नंपुसकत्व येईल असेही अनेकांना वाटत असते. कुटुंब नियोजन करणे ही पुरुषाची नव्हे तर स्त्रीची जबाबदारी आहे अशी विचित्र भावना अजूनही समाजात आहे. तसेच कंडोम वापरणे म्हणजे पुरुषत्वाला आव्हान असाही एक खुळा समज प्रचलित आहे.
महिलांना सर्वाधिक त्रास
लैंगिक संबंधाचे परिणाम महिलांना जास्त भोगावे लागतात. त्यांना गर्भधारणा होते. अनेक मानसिक, शारिरिक प्रश्न उद्भवतात. मात्र ही गोष्ट लक्षात न घेता अनेक पुरुष कंडोमशिवाय लैंगिक क्रिया पार पाडतात. हा महिलांचा एकप्रकारे केलेला छळच आहे. सुरक्षित लैंगिक संबंध, कुटुंब नियोजन याबाबत केंद्र व राज्य सरकारे लोकजागृती करत असली तरी ती अजून प्रभावी होणे आवश्यक आहे. कंडोमचा दर्जा व त्याचे प्रकार यामध्ये गेल्या काही वर्षांत खूप सुधारणा झाली आहे. कंडोमचे विविध फ्लेवर उपलब्ध आहेत. त्याच्या आकर्षक जाहिराती दूरचित्रवाहिन्यांवर दाखविण्याइतका मोकळेपणा आपल्यात रूजत चालला आहे. मात्र तरीही पुरुषांकडून कंडोमच्या वापराचे प्रमाण जितके वाढायला हवे तितके ते नाही याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांनी वारंवार चिंता व्यक्त केली आहे.
कोरोना नियमांमुळेही वापर कमी
२०२० पासून देशात कोरोनाची साथ सुरू झाली असून ती अजून संपण्याची चिन्हे नाहीत. या काळात लागू केलेले प्रतिबंधक नियम, संसर्गाचा धोका आदी तसेच पारंपारिक मानसिकतेमुळे देखील कंडोमचा वापर कमी झाला होता. २०१९-२० या कालावधीत देशात २ अब्ज कंडोम विकले गेले. त्यातून १५२१ कोटी रुपयांची उलाढाल झाली. भारताची एकूण लोकसंख्या लक्षात घेता ही आकडेवारी नगण्य आहे. सोशल मीडिया तसेच डेटिंग अप्समुळे सेक्स हा विषय समाजामध्ये अधिक उघडपणे प्रकटला आहे. मात्र या गोष्टींचा वापर करणारे बहुसंख्य तरूण कंडोमचा वापर करणे टाळतात ही देखील विसंगती आहे. आधुनिक काळाबरोबर जगायचे असेल तर त्यात कंडोम हे देखील महत्वाचे साधन आहे हे विसरून चालणार नाही. कारण त्याच्या वापराने आरोग्य सुरक्षित राहाते.