महाराष्ट्रातल्या निवडणुकीसाठी NDAची मोठी तयारी; १३ मुख्यमंत्री अन् १६ उपमुख्यमंत्र्यांसह मोदींची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 11:19 AM2024-10-17T11:19:54+5:302024-10-17T11:26:17+5:30

चंदीगड येथे होणारी एनडीएची बैठक महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे.

Why is PM Modi holding NDA mega meeting in Chandigarh before Maharashtra elections | महाराष्ट्रातल्या निवडणुकीसाठी NDAची मोठी तयारी; १३ मुख्यमंत्री अन् १६ उपमुख्यमंत्र्यांसह मोदींची बैठक

महाराष्ट्रातल्या निवडणुकीसाठी NDAची मोठी तयारी; १३ मुख्यमंत्री अन् १६ उपमुख्यमंत्र्यांसह मोदींची बैठक

PM Modi NDA Chandigarh Meeting:  लोकसभा निवडणुकीनंतर नुकत्याच हरयाणा आणि जम्मू आणि काश्मीर या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. आता महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची मोठी लढत होणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने काही जागा गमावल्या. तेव्हा नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी केंद्रात मोदी सरकार स्थापन करून भाजपला हॅटट्रिकची संधी मिळवून दिली. सार्वत्रिक निवडणुकीत पूर्ण बहुमत न मिळणे हा भाजपसाठी इतका मोठा धक्का होता, जो एखाद्या राष्ट्रीय समस्येपेक्षा कमी नव्हता.

लोकसभेनंतर हरयाणात भाजपचा तिसरा विजय महत्त्वाचा ठरला. तसेच काँग्रेसकडून विजय खेचून आणला. हा निकाल भाजपसाठी जीवदान देणारा ठरला आहे. गेल्या काही महिन्यांत इंडिया आघाडीमध्येही कुरबुरी सुरु असल्या तरी बुधवारी जम्मू-काश्मीरमध्ये ओमर अब्दुल्ला यांच्या शपथविधी समारंभात एकजूट दाखवण्याचा प्रयत्न झाला. आता त्याच्या दुसऱ्याच दिवशी भाजपनेही मोठी खेळी खेळली आहे. चंदीगडमध्ये आज एनडीएचे शक्तीप्रदर्शन होणार आहे. हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्या शपथविधीतून एनडीएची ताकद दाखवण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशिवाय राजनाथ सिंह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे वरिष्ठ नेते चंदीगडच्या पंचकुलाला पोहोचले आहेत.


पंचकुलामध्ये शपथविधी सोहळ्यानंतर एनडीए शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची एक महत्त्वाची बैठक होणार आहे. विरोधी पक्षांवर दबाव ठेवण्यासाठी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह इतर नेते उपस्थित राहणार आहेत. यावेळी महाराष्ट्र आणि झारखंड निवडणुकीत विरोधकांना घेरण्यासाठी चक्रव्यूह निर्माण करण्यावर चर्चा होणार असल्याचे मानले जात आहे. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार आहे. एकट्या भाजपकडे १३ मुख्यमंत्री आणि १६ उपमुख्यमंत्री आहेत. चंदीगडमधल्या एनडीएच्या शक्ती प्रदर्शनात महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, बिहार, सिक्कीम, नागालँड आणि मेघालयचे मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर आपली ताकद दाखवणार आहेत. 

भाजपने जारी केलेल्या निवेदनात असेही म्हटले आहे की एनडीएच्या मुख्यमंत्र्यांच्या चर्चेमध्ये राष्ट्रीय विकासाच्या मुद्द्यांचा समावेश असलेला अजेंडा असेल. यावेळी 'संविधानाचा अमृत महोत्सव' आणि 'लोकशाहीच्या हत्येच्या प्रयत्नाला पन्नास वर्षपूर्ती या विषयांवरही चर्चा होणार आहे.

दुसरीकडे, १७ ऑक्टोबर म्हणजेच आज वाल्मिकी जयंती आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये सरकारी सुट्टी असते. हरयाणामध्येही आज सुट्टी असून नायब सिंग सैनी आणि एनडीएची बैठक आजच होत आहे. वाल्मिकी जयंतीच्या दिवशी एनडीए १४० कोटी देशवासियांना विशेषतः दलित मतदारांना उघडपणे सांगण्याचा प्रयत्न करेल की भाजप संविधानाचे रक्षण करते आणि त्यांनी अनुसूचित जाती आणि जमातीच्या मतदारांची ती खूप काळजी घेते आणि आरक्षण संपवण्याचे समर्थन करत नाही. तर काँग्रेसने ५० वर्षांपूर्वी आणीबाणी लादून लोकशाहीचा गळा दाबला आणि भाजपविरोधात खोटं नरेटिव्ह पसरवलं होतं.

लोकसभा निवडणुकीदरम्यान इंडिया आघाडीच्या काँग्रेस आणि सपा या दोन पक्षांकडे झुकलेल्या अनुसूचित जातींच्या मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी ही तारीख अत्यंत काळजीपूर्वक निवडण्यात आल्याचे भाजपने म्हटलं आहे. केंद्रात तिसऱ्यांदा भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाले असले तरी, १० वर्षे अखंडपणे राज्य करणाऱ्या भाजपला २०२४ मध्ये पूर्ण बहुमताच्या तुलनेत ३२ जागा कमी मिळाल्या होत्या.

Web Title: Why is PM Modi holding NDA mega meeting in Chandigarh before Maharashtra elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.