येडियुरप्पांसाठी ४९ वर्ष जुनी ॲम्बेसेडर का आहे इतकी खास? काय आहे ‘नशीबाशी कनेक्शन’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 01:20 PM2023-04-20T13:20:04+5:302023-04-20T13:21:49+5:30
येडियुरप्पा हे यांच्या मनाच्या अगदी जवळ आहे ही कार, जाणून घ्या का?
कर्नाटक भाजपचे दिग्गज नेते बीएस येडियुरप्पा पुन्हा एकदा त्यांच्या मुलाच्या अर्जासाठी त्यांच्या आवडत्या ॲम्बेसेडर कारमध्ये दिसले. येडियुरप्पा यांच्या संघर्षात ही कार त्यांची जुनी सहकारी राहिली आहे. यामुळेच येडियुरप्पा कोणत्याही खास मोठ्या प्रसंगी त्यातून प्रवास करायला विसरत नाहीत. शिवमोग्गा येथील शिकारीपुरा जागेसाठी त्यांचा मुलगा बी.वाय. विजयेंद्र यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते त्यांच्या ४९ वर्ष जुन्या कारमधून पोहोचले. येडियुरप्पा २० किमी अंतरावर असलेल्या त्यांच्या फार्महाऊसवरुन कारमधून शहरात पोहोचले होते.
कशी खास बनली CKR- 45?
१९७० च्या दशकानंतर पांढरी ॲम्बेसेडर येडियुरप्पा यांच्या यशाचं ओळख बनली. त्यावेळी ८० आणि ९० चा काळ होता. येडियुरप्पा जेव्हा कर्नाटकात पक्षाची पुनर्बांधणी करण्याच्या प्रयत्नात उतरले तेव्हा ही कार सातत्यानं त्यांच्या सोबत होती. येडियुरप्पा यांना तेव्हा कार कशी चालवायची हे माहीत नव्हतं. शिवमोग्गा शहरातील एका व्यावसायिकाकडून त्यांनी १९७४ मध्ये ही अॅम्बेसेडर कार खरेदी केली होती. या कारचा क्रमांक होता CKR 45. ज्यामुळे ते या कारकडे आकर्षित झाले. त्यानंतर येडियुरप्पा यांनी ज्या कार खरेदी केल्या त्या सर्वांमध्ये ४५४५ हा नंबर आहे.
अंकशास्त्रावर भरवसा करतात
येडियुरप्पा यांचा अंकशास्त्रावर पूर्ण विश्वास आहे आणि ते ९ हा त्यांचा भाग्यवान क्रमांक मानतात. त्यांची जन्मतारीख 27 (फेब्रुवारी) आहे. म्हणजेच, दोन्ही संख्या जोडल्या गेल्यास त्याची बेरीज नऊ होते. ही कार वडिलांची आवडती असल्याचं मुलगा विजयेंद्र यांनी सांगितलं. या आवडत्या अॅम्बेसेडर कारनं येडियुरप्पा यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. 'आमच्या कुटुंबासाठी ही एक भाग्यवान कार आहे,’ असंही त्यांनी सांगितलं.