धर्मग्रंथांतही उल्लेख नसलेली ‘जात’ अजून जात का नाही? 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 05:50 AM2024-06-27T05:50:03+5:302024-06-27T05:50:33+5:30

खरं तर निसर्गानं ‘माणूस’ ही एकच ‘जात’ निर्माण केली. माणसाने मात्र श्रेष्ठत्ववादात गुंतून स्वतःला संकुचित विचारांनी बंदिस्त करून घेतलं.

Why is the caste which is not even mentioned in the scriptures not yet a caste | धर्मग्रंथांतही उल्लेख नसलेली ‘जात’ अजून जात का नाही? 

धर्मग्रंथांतही उल्लेख नसलेली ‘जात’ अजून जात का नाही? 

डॉ. अंजली मुळके, माजी वैद्यकीय अधिकारी

धर्म, जात, पोटजात, पंथ, आदी गोष्टींचे सर्वांत जास्त अवडंबर कुठे मांडले जात असेल, तर ते भारतात. इतिहासात जरा खोलवर डोकावले तर लक्षात येईल, धर्म ही संकल्पना सर्वच धर्मग्रंथांत फार उदात्त अर्थ सांगते. समाजात वावरताना सर्वच स्तरावर, नीतिमत्ता, कायदे, सद्गुण आणि सामाजिक सलोखा जपून ठेवण्यासाठी जी सर्वसाधारण वागण्याची पद्धत, आचरण नियम सांगितले जातात, त्याला धर्म असे थोडक्यात म्हटले जाते. म्हणजेच, जगण्यासाठीचा योग्य मार्ग यात सांगितला जातो. जे लोक ही नीतिमत्ता, नियम पाळणार नाहीत, ते ‘अधर्मी’, इतकी सहज, सोपी व्याख्या आपण यात पाहू शकतो.

पुढे कालौघात ‘वर्ण’ या संकल्पनेची उत्पत्ती झाली.. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे चार वर्ण निर्माण झाले. मात्र, कालांतराने या वर्ण व्यवस्थेचा विपर्यास होत श्रेष्ठत्ववाद बोकाळला आणि समाजात कर्मकांड, यज्ञयाग, कुप्रथा यांचे स्तोम माजले. ‘जाती’ या शब्दाचाही भारतीय धर्मग्रंथांत कुठेही उल्लेख आढळत नाही. फार तर ‘ज्ञाती’ हा शब्द काही ठिकाणी पाहायला मिळतो असे समाजशास्त्रज्ञ सांगतात. ज्ञाती म्हणजे देखील आजची ‘जाती’ नव्हेच. ज्ञाती म्हणजे ‘जन्म’. ‘जात’ या भारतीय समाजव्यवस्थेचा पाया असणाऱ्या शब्दाचा शोध घेतला, तर काही समाजशास्त्रज्ञांच्या मते जात ही सामाजिक स्तरीकरणाची एक व्यवस्था होती. पुढे यात अनेक कांगोरे वाढत गेले. व्यवसाय, व्यापार, रोटी-बेटी व्यवहार, आदी गोष्टी सामावून याला वेगळे स्वरूप प्राप्त झाले. असं असलं तरी सर्व जातींना व्यवसाय बदलण्याचे स्वातंत्र्य होते, असे समाजशास्त्रज्ञ सांगतात. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे सर्वच लोक शेती करत असत आणि युद्धातदेखील एकत्र शस्त्रास्त्रे घेऊन लढायला जात असत, हेही इतिहासात आपण पाहतो. मग जात या शब्दात बदल कधी झाले? कधीपासून यात श्रेष्ठ, हीन भावना गुंतत गेल्या? 

- ब्रिटिश काळात आर्थिक स्वार्थासाठी इंग्रजांनी या सामाजिक स्तराला त्यांच्या ‘कास्ट’ या शब्दात अंतर्भूत केले. कास्ट हा इंग्रजी शब्द, ‘कास्टा’ या पोर्तुगीज शब्दापासून बनला होता. तो इंग्रजांनी त्यांच्या आर्थिक आणि वसाहतवादी राजकीय स्वार्थासाठी भारतातील समाजावर चिकटवून दिला. त्यांनी आपल्या पदरी असलेल्या प्रशासकीय सेवेत, जातीय श्रेष्ठ-कनिष्ठ, उच्च-नीच.. असे भेद करून लोकांच्या नेमणुका केल्या.

‘फोडा आणि राज्य करा’ ही गलिच्छ कूटनीती समाजात दृढ करत, जाती-जातीत आणि धर्मा-धर्मात संघर्ष पेटवून त्यांच्या ‘एक’ होण्याला सुरुंग लावला. स्वातंत्र्यानंतरदेखील इंग्रजांनी पेरून ठेवलेला हा भेद भारतीयांच्या डोक्यातून गेला नाही. मूळ भारतीय तत्त्वज्ञानाच्या संकल्पनांना बगल देत लोक कित्येक धर्म, जाती-पोटजातीत विभागले गेले. 

तसं पाहायला गेलं, तर निसर्गाने माणसाची माणूस ही एकच जात निर्माण केली. फार तर नैसर्गिक कर्म आणि लिंगभेदाने, स्त्री आणि पुरुष या दोन जाती आपण म्हणू शकू. जन्म ते मृत्यूपर्यंत शारीरिक, मानसिक, भावनिक असे कुठलेच भेद निसर्गाने माणसाला दिले नसताना, माणसाने मात्र अहंकारापोटी श्रेष्ठत्ववादात गुंतून स्वतःला ‘जात’ नावाच्या संकुचित विचारांनी बंदिस्त करून घेतलं आहे.

विकास साधायचा असेल, तर सामाजिकरीत्या विखुरलेले माणूसपण आपल्याला एकसंध करावे लागेल. सामाजिक सलोखा राखण्यासाठी, जिथे धर्मात नीतिमत्ता सांगितली जात होती, तिथे अराजकता माजवण्यासाठी आता जात वापरली जात आहे. या देशाच्या कुठलाही ग्रंथात साधा शाब्दिक आधारदेखील नसलेली अशी ही ‘जात’ जात का नाही? - कारण आपणच तिला घालवत नाही. स्वार्थी विचारांनी आलेलं हे विषारी पीक आपली विखारी पाळेमुळे घट्ट रोवून घराघरांत विद्वेषाचे विष पसरवत आहे. कारण त्याला आपणच अविचारांचे खतपाणी घालत वाढवत आहोत. जात केवळ स्वार्थ साधण्यासाठीच वापरली जात आहे, हे वास्तव ओळखून आता सामान्य जनतेनेच ही जातीय भेदाभेद स्वतःहून समाजातून घालवायला हवी.

Web Title: Why is the caste which is not even mentioned in the scriptures not yet a caste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.