हाच का बलिदानाचा सन्मान?; शहीद जवानाच्या संतप्त माता-पित्याने परत केलं शौर्य पदक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 10:21 PM2022-09-08T22:21:26+5:302022-09-08T22:22:47+5:30
आमच्या मुलाने देशासाठी बलिदान दिलं, पण सरकारने त्या बलिदानाची अशी किंमत केली
नवी दिल्ली - गुजरातच्या अहमदाबाद येथील रहिवाशी असलेल्या लान्स नायक गोपालसिंह भदोरिया यांच्या आई-वडिलांनी शौर्य चक्र सरकारला परत पाठवले आहे. कुरिअरने हे शौर्य चक्र भदोरिया कुटुंबीयांसाठी आले होते. शौर्य चक्र कुरिअरने पाठवणे हा आमच्या शहीद मुलाच्या बलिदानाचा हा अपमान असल्याचे सांगत ते परत पाठविले. आता, राष्ट्रपती भवन येथे जाऊन सर्वांसमक्ष हे शौर्यचक्र प्रदान करण्यात यावे, अशी मागणी भदोरिया कुटुंबीयांकडून होत आहे.
आमच्या मुलाने देशासाठी बलिदान दिलं, पण सरकारने त्या बलिदानाची अशी किंमत केली. शौर्य पदक हे गुप्त ठेवण्याची वस्तू नाही, जे सरकारकडून असं गुपचूप देण्यात येत आहे. माझ्या मुलाने देशासाठी बलिदान दिलं आहे, त्यामुळे देशासमोर त्याचा सन्मान झाला पाहिजे, असे शहीद गोपालसिंह यांच्या आई-वडिलांनी म्हटले.
गोपालसिंह यांना मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्यातील उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विशिष्ट सेवा पदकानेही सन्मानित करण्यात आले आहे. दरम्यान, २००१७ मध्ये जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत गोपालसिंह यांना वीरमरण प्राप्त झाले होते.
गोपालसिंह यांचे २००७ साली लग्न झाले होते, मात्र काही मतभेदामुळे ते २०११ पासून आपल्या पत्नीपासून विभक्त राहात होते. दोघेही व्यस्त असल्याने न्यायालयाने २०१३ मध्ये त्यांची विभक्त होण्याची याचिका रद्द केली. दरम्यान, २०१७ मध्ये गोपालसिंह हे शहीद झाले. त्यानंतर, पत्नी आणि आई-वडिल यांच्यातील वादामुळे लाभ देण्यास विलंब झाला. सन २०२१मध्ये न्यायालयाने आई-वडिलांना पुरस्कारासंबंधित सर्व लाभ देऊ केले. तर, सैन्य दल आणि सरकारकडून मिळणारे इतर सर्व लाभ हे पत्नी आणि आई-वडिलांमध्ये ५० टक्के विभागून द्यावेत, असेही न्यायलायाने निकालात म्हटले होते.