उद्धव ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण का नाही?; कारण सांगत मुख्य पुजाऱ्यांची आगपाखड, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 11:33 AM2024-01-01T11:33:14+5:302024-01-01T11:39:42+5:30
राम मंदिर सोहळ्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असताना राम जन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी निमंत्रण वादावर प्रतिक्रिया दिली आहे.
Uddhav Thackeray Ram Mandir ( Marathi News ) : अयोध्येत २२ जानेवारी रोजी राम मंदिर प्रतिष्ठापणा सोहळा होणार असून या भव्यदिव्य सोहळ्यासाठी देशभरातील दिग्गज राजकीय नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अद्याप या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही. यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असताना राम जन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी निमंत्रण वादावर प्रतिक्रिया दिली आहे. "जे रामाचे भक्त आहेत, केवळ त्यांनाच या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे," अशा शब्दांत आचार्य सत्येंद्र दास यांनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
भाजपकडून राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आला होता. त्यावर बोलताना सत्येंद्र दास यांनी म्हटलं की, "भाजपकडून भगवान रामाच्या नावाचा वापर केला जात असल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. आपल्या पंतप्रधानांचा सगळीकडेच सन्मान होत असतो. त्यांनी खूप मोठं काम केलं आहे. राम मंदिर हा मुद्दा त्यांच्यासाठी राजकारण नसून भक्ती आहे," असं दास यांनी म्हटलं आहे.
"भाजपने आता फक्त भगवान राम यांना उमेदवार म्हणून घोषित करणं, हेच बाकी ठेवलं आहे," असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला होता. त्यावरूनही सत्येंद्र दास यांनी राऊत यांचा समाचार घेतला आहे. "संजय राऊत यांना इतकं दु:ख होत आहे की ते सांगूही शकत नाहीत. ही लोकं रामाच्या नावावर निवडणुका लढवत होती. मात्र आता रामाला मानणारे लोक सत्तेत आहेत, त्यामुळे असं वक्तव्य करून राऊत रामाचा अपमान करत आहेत," असं ते म्हणाले.
राम मंदिर निमंत्रणाबद्दल काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण न मिळाल्याच्या मुद्द्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं होतं की, "आम्हाला अद्याप निमंत्रण मिळालेलं नाही. मात्र आम्ही कधीही जाऊन दर्शन घेऊ शकतो. मी मुख्यमंत्री असताना, त्यापूर्वीही आयोध्येत जाऊन रामलल्लाचं दर्शन घेतलं आहे, त्यामुळे आयोध्येत जाऊन कधीही दर्शन घेईन. अयोध्येमध्ये राममंदिर होणं ही आनंदाची गोष्ट आहे. कारण त्याच्यासाठी शिवसेनेनं खूप मोठा संघर्ष केला आहे. शिवसेनाप्रमुखांनी राममंदिर आणि हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून त्यांचा मतदानाचा अधिकार हिसकावून घेण्यात आला होता. राममंदिरासाठी अनेक शिवसैनिक-कारसेवकांनी रक्त साडंलेलं आहे," असं ठाकरे यांनी म्हटलं होतं.