प्रभू श्रीरामांचं मंदिर अयोध्येतच का हवं? फारूक अब्दुलांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 12:27 PM2018-11-27T12:27:31+5:302018-11-27T12:30:07+5:30
काँग्रेस नेते मनिष तिवारी यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात फारूक अब्दुल्ला यांनी मोदी सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.
नवी दिल्ली - जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे प्रमुख फारूक अब्दुल्ला यांनी राम मंदिर मुद्द्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजपा आणि शिवसेनेला टोलाही लगावला आहे. जर प्रभू श्रीराम हे संपूर्ण विश्वाचे आहेत, तर त्यांचे मंदिर केवळ अयोध्येतच का ? असा प्रश्न फारूक अब्दुल्ला यांनी उपस्थित केला आहे.
'मेरी माँ को गाली दिया, मेरे बाप को गाली दिया, असं बोलणं मोदींना शोभतं का?
काँग्रेस नेते मनिष तिवारी यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात फारूक अब्दुल्ला यांनी मोदी सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. तसेच राम मंदिराच्या मुद्द्यावरुनही भाजपाला लक्ष्य केलं. जर प्रभू श्रीराम हे अवघ्या विश्वाचे आणि सर्वव्यापी आहेत, तर त्यांचे मंदिर केवळ अयोध्येतच का, असा प्रश्न अब्दुल्ला यांनी उपस्थित केला आहे. त्यावर, तेथे उपस्थित जदयू नेता पवन वर्मा यांनी अब्दुल्ला यांच्या प्रश्नावर उत्तर दिले. अयोध्या हे प्रभू श्रीराम यांचे जन्मस्थळ आहे. त्यामुळे अयोध्येत श्रीरामांचे मंदिर व्हावे ही हिंदूंची भावना आहे. मग, अयोध्येत मंदिर का होऊ शकत नाही ? असा उलट प्रश्न पवन वर्मा यांनी विचारला. दरम्यान, अब्दुल्ला यांनी मोदींच्या भाषणातील आई-वडिलांच्या उल्लेखाबद्दलही मोदींवर टीका केली. मोदी नेहमी आपल्या भाषणात स्वत:च्या आई-वडिलांचा उल्लेख करतात. मेरी माँ को गाली दिया, मेरे बाप को गाली दिया ?. पण पंतप्रधानांना हे शोभतं का, असा सवाल फारूक अब्दुल्ला यांनी उपस्थित केला आहे.