मोदी अचानक लाहोरला का गेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2016 11:33 PM2016-01-05T23:33:42+5:302016-01-05T23:33:42+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींना असे कोणते आश्वासन मिळाले होते की अचानक ते लाहोरला गेले? सरकार नेमके काय करू इच्छिते? याचे उत्तर देशाला हवे आहे.
सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींना असे कोणते आश्वासन मिळाले होते की अचानक ते लाहोरला गेले? सरकार नेमके काय करू इच्छिते? याचे उत्तर देशाला हवे आहे. आपले परराष्ट्र धोरणही सरकारने लवकरात लवकर स्पष्ट केले पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे राज्यसभेतील उपनेते आनंद शर्मा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.
पठाणकोट हवाईदल तळावरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर चौथ्या दिवशी, काँग्रेसतर्फे कठोर प्रतिक्रिया व्यक्त करतांना गंभीर स्वरात शर्मा म्हणाले, पठाणकोटची घटना केवळ दहशतवादी हल्ला नसून साऱ्या देशावर चढवण्यात आलेला हल्ला आहे. त्याला चोख प्रत्युत्तर देतांना वीरमरण आलेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण करीत शर्मा पुढे म्हणाले, हे आव्हान इतक्या गंभीर स्वरूपाचे आहे की दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात एका सुरात साऱ्या देशातून आवाज उठला पाहिजे. काँग्रेस पक्ष अशा प्रसंगात अर्थातच देशाबरोबर आहे. तथापि या घटनेच्या पार्श्वभूमीवर काही गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत, सरकारकडून ज्याचे उत्तर साऱ्या देशाला हवे आहे.
सरकारला सवाल विचारीत शर्मा म्हणाले, आॅगस्ट महिन्यात उभय देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची नियोजित चर्चा रद्द करण्यात आली. त्यानंतर बँकॉकमधे दोन्ही सुरक्षा सल्लागारांची अचानक बैठक झाली. त्या चर्चेतून नेमके काय निष्पन्न झाले? पंतप्रधानांची या चर्चेला संमती होती काय? रशियाच्या उफा आणि फ्रान्सच्या पॅरिस शहरात पंतप्रधान मोदी नवाज शरीफाना भेटले. त्या भेटीत असे कोणते आश्वासन मोदींना मिळाले की अफगाणिस्तानातून परततांना पंतप्रधानांना अचानक लाहोरला जावेसे वाटले?
विशेष म्हणजे लाहोर भेटी प्रसंगी पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार जंजुआ उपस्थित नव्हते. त्यामुळे भारताबरोबरच्या चर्चेत पाकिस्तानात एकमत नाही असे चित्र दिसू लागले. एकप्रकारे भारताला हा इशाराच नव्हता काय?
लाहोर भेटीत पंतप्रधानांनी नेमके काय साधले, ते तिथे का गेले होते? याची कोणतीही माहिती देशाला नाही. त्याची स्पष्ट उत्तरे सरकारने दिली पाहिजेत, असेही शर्मा म्हणाले.