वडील पाठपुरावा करीत असताना त्रयस्थांच्या याचिकेची गरज काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 02:34 AM2020-08-08T02:34:46+5:302020-08-08T02:35:43+5:30
सुशांत सिंह मृत्यू; कोर्टाने याचिका फेटाळली
नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूच्या संदर्भात त्याचे वडील स्वत: कायदेशीर पाठपुरावा करत असताना तुमच्यासारख्या त्रयस्थाने याचिका करण्याची गरज काय? असे विचारत कायदा शाखेच्या एका विद्यार्थ्याने केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली.
सुशांत सिंहचे वडील कृष्ण किशोर सिंह यांनी सुशांतची मैत्रीण व अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद पाटणा पोलिसांकडे केली होती. त्याचा तपास बिहार सरकारच्या विनंतीवरून ‘सीबीआय’ने हाती घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील एक कायदा शाखेचा विद्यार्थी द्विवेंद्र देवतादीन दुबे याने केलेली याचिका न्यायालयापुढे आली. त्यात हा तपास ‘सीबीआय’ किंवा ‘एनअयए’कडे सोपविण्याची विनंती करण्यात आली होती. ही याचिका फेटाळताना सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे, न्या. ए. एस. बोपण्णा व न्या. व्ही. रामासुब्रह्मण्यन यांच्या खंडपीठाने म्हटले की, मृताचे (सुशांत सिंह) वडील या प्रकरणाचा स्वत: पाठपुरावा करत आहेत. तो ते नीटपणे करणार नाहीत, असे मानण्याचे काहीच कारण नाही.
सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाच्या असे निदर्शनास आणले की,सुशांत सिंहच्या मृत्यूच्या संदर्भात मुंबईत एक व पाटण्यात एक असे दोन गुन्हे नोंदले गेले आहेत. त्यापैकी पाटण्यातील गुन्ह्याचा तपास बिहार सरकारच्या विनंतीवरून ‘सीबीआय’ने स्वीकारला आहे.
रियाची मागणी अनाठायी
च्रिया चक्रवर्तीने दाखल केलेल्या याचिकेवर बिहार सरकारने सर्वोच्च न्यायालयात उत्तराचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
च्बिहारमध्ये तिच्याविरुद्ध नोंदविलेला गुन्हाही मुंबई पोलिसांकडे वर्ग करण्याची याचिकेतील तिची मागणी अनाठायी, अकाली व कायद्यात न बसणारी असल्याचे बिहार सरकारचे म्हणणे आहे.
च्न्यायालयाने ३० जुलै रोजी अशाच मागणीची आणखी एक याचिका फेटाळताना याचिकाकर्त्यास सांगितले होते की, तपासातील उणिवांबद्दल तुमच्याकडे काही ठोस माहिती असेल तर मुंबई उच्च न्यायालयाकडे जा.