दंगलीसाठी ईशान्य दिल्लीच का?, अरुंद रस्ते व निमुळत्या गल्ल्या सोयीच्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 06:48 AM2020-03-02T06:48:04+5:302020-03-02T06:48:20+5:30
उत्तर-पूर्व दिल्लीतील दंगल शमली तरी यातून काही प्रश्न निर्माण झाले आहेत. दंगलीसाठी या भागाची का निवड करण्यात आली?
सुरेश भुसारी
नवी दिल्ली : उत्तर-पूर्व दिल्लीतील दंगल शमली तरी यातून काही प्रश्न निर्माण झाले आहेत. दंगलीसाठी या भागाची का निवड करण्यात आली? या भागातील लोकसंख्या व सामाजिक स्थितीचे पदरही या दंगलीने समोर आले आहेत. दिल्लील उत्तर-पूर्व दिल्ली जिल्हा हा देशातील सर्वात दाट लोकवस्तीच्या भागापैकी एक आहे. अरुंद रस्ते, निमुळत्या गल्ल्या हे या भागाचे वैशिष्ट्य आहे. या निमुळत्या गल्ल्यांमुळे दंगेखोर नेमके कुठे लपले आहे. याचा सुगावा लोकांना येत नव्हता. एखाद्या गल्लीत दबा धरून बसलेले दंगेखोर लोक रस्त्यावर आल्यानंतरच थेट हल्ला करीत होते.
उत्तर-पूर्व दिल्ली जिल्ह्याची लोकसंख्या २२ लाख ४० हजारावर आहे. या जिल्ह्यातील लोकसंख्येची घनता ३६,१५५ प्रती चौरस मीटर एवढी आहे. दिल्लीच्या इतर जिल्ह्याचा विचार केल्यास मध्य दिल्लीची लोकसंख्येची घनता २७,७३० प्रती चौरसमीटर एवढी आहे. नवी दिल्ली जिल्ह्याची लोकसंख्येची प्रती चौरस मीटर घनता केवळ ५११७ आहे. म्हणजे नवी दिल्ली जिल्ह्याच्या सातपटीने उत्तर-पूर्व जिल्ह्याच्या लोकसंख्येची घनता आहे. यावरून उत्तर पूर्व दिल्ली जिल्हा किती दाट लोकवस्तीचा आहे, हे स्पष्ट होते. दाट लोकवस्ती ही दंगल करणाऱ्यासाठी सोईची असते. कमी क्षेत्रामध्ये अधिक लोकांवर हल्ला करण्याची संधी या लोकसंख्येच्या घनतेमुळे मिळत असल्याने दंगलखोरांनी नियोजनपूर्वक या भागाची निवड केल्याचे स्पष्ट झाले आहे.
>परावलंबी व्यक्तींचे प्रमाण अधिक
या भागाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या जिल्ह्यात एकाच व्यक्तीवर अवलंबून असणाºया व्यक्तींची संख्या अधिक आहे. २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार या भागातील ७०.५ टक्के लोकसंख्या कमाविणारी नाही म्हणजे कुटुंबातील एका व्यक्तीवर अवलंबून असणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. या भागातील केवळ ३० टक्के व्यक्तींकडे उत्पन्नाचे साधन असून इतर यांच्या उत्पन्नावर अवलंबून आहेत. या दंगलीत उत्पन्न करणाºया व्यक्तींना लक्ष्य करण्यात आले होते. या दंगलीनंतर या भागातील भीषण स्थितीला आता सामोरे जावे लागत आहे.
>६ वर्षांखालील मुले जास्त : या जिल्ह्यात ६ वर्षांखालील मुलांची संख्या ही तब्बल ३ लाखांवर आहे. ही संख्या या जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या १३.४७ टक्के एवढी आहे. तसेच या भागाची निरक्षरताही सर्वाधिक आहे. या जिल्ह्यातील साक्षरतेचे प्रमाण ८२ टक्के एवढे आहे; परंतु महिला साक्षरतेचे प्रमाण हे केवळ ७६.५१ टक्के एवढेच आहे. हे प्रमाण नवी दिल्लीतल इतर सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी आहे.
>ग्राहक कुठे आहे?
या संदर्भात बोलताना या भागातील ज्येष्ठ नागरिक म्हणाला, या दंगलीने या भागातील आर्थिक व्यवस्थाच कोलमडली आहे. आता दुकाने सुरू दिसत असले तरी ग्राहक कुठे आहे? असा त्यांचा सवाल होता. शनिवारला दुपारी या भागातील ९० टक्के दुकाने सुरू होती. परंतु ग्राहक मात्र नव्हते. शनिवारला दुपारी मौजपूर येथील ब्रह्मपुरी मार्ग निर्मनुष्य होता. या भागाची सामाजिक व आर्थिक स्थितीमुळे या भागाचे वास्तव अधिक भीषण झाल्याचे दिसून येत आहे.