क्रिकेट सामन्याला परवानगी का दिली?, प्रदूषणाबाबत उपाय न योजल्याबद्दल नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 04:16 AM2017-12-05T04:16:43+5:302017-12-05T04:17:13+5:30
दिल्लीमधील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी काय उपाययोजना करणार, याबाबतचा सविस्तर आराखडा सादर न केल्याबद्दल राष्ट्रीय हरित आयोगाने सोमवारी दिल्ली सरकारला फटकारले
नवी दिल्ली : दिल्लीमधील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी काय उपाययोजना करणार, याबाबतचा सविस्तर आराखडा सादर न केल्याबद्दल राष्ट्रीय हरित आयोगाने सोमवारी दिल्ली सरकारला फटकारले. इतके प्रदूषण व धुरके असताना, कोटला मैदानावर भारत-श्रीलंका कसोटी सामन्याला परवानगी का दिली, असा सवालही आयोगाने दिल्ली सरकारला केला. उपाययोजनेबाबतचा तुमचा आराखडा कुठे आहे? तो तुम्ही आतापर्यंत सादर का केला नाही? तुम्ही तुमची भूमिका रोज बदलत राहिलात तर आयोगाने करायचे तरी काय, असा सवाल करीत आयोगाचे अध्यक्ष व माजी सरन्यायाधीश स्वतंत्रकुमार यांनी ४८ तासांमध्ये आराखडा सादर करण्याचे आदेश दिल्ली सरकारला दिले. त्याआधी आराखडा सादर करण्यासाठी आम्हाला मुदतवाढ द्यावी, अशी विनंती दिल्ली सरकारचे मुख्य सचिव व पर्यावरण सचिव यांच्यातर्फे आयोगाला करण्यात आली.
हे सहन करीत राहायचे?
दिल्लीतील धुरके व प्रदूषणाच्या रोजच्या रोज वर्तमानपत्रांत मोठ्या बातम्या येत आहेत, हवा अधिकाधिक वाईट होत आहे, खेळाडूंनाही तोंडाला मास्क लावण्याची वेळ आली आहे. असे असताना तुम्ही आतापर्यंत काही केले नाही, या शब्दांत नाराजी व्यक्त करीत, दिल्लीकरांनी हे सारे सहन करीतच राहावे, असे तुम्हाला वाटते की काय, असा सवालही हरित आयोगाने दिल्ली सरकारला केला.