‘त्या’ आमदाराला अटक का नाही ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 04:08 AM2018-04-13T04:08:39+5:302018-04-13T04:08:39+5:30
युवतीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या भाजपाच्या आमदार कुलदीपसिंग सेनगरचा उल्लेख पोलीस महासंचालकांनी ‘माननीय’ असा केल्याने संतापाची लाट उमटली आहे.
लखनऊ : युवतीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या भाजपाच्या आमदार कुलदीपसिंग सेनगरचा उल्लेख पोलीस महासंचालकांनी ‘माननीय’ असा केल्याने संतापाची लाट उमटली आहे. दुसरीकडे सेनगरला अद्याप अटक का केली नाही, असा सवाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने योगी आदित्यनाथ सरकारला केला आहे.
‘माननीय’ कुलदीपसिंग सेनगर यांना अटक करण्याची वेळ आल्यास पोलीस नव्हे तर सीबीआय करेल, असे पोलीस महासंचालक ओ. पी. सिंग म्हणाले. त्यांच्यावर आरोप आहे, ते अद्याप दोषी ठरलेले नाहीत. त्यामुळे त्यांना माननीय म्हणण्यात काही चूक नाही, असे समर्थनही पोलीस महासंचालकांनी केले. अर्थात त्यांना वाचविण्याचा आमचा हेतू नाही, अशी सारवासारवही त्यांनी नंतर केली. उत्तर प्रदेशचे गृहसचिव अरविंद कुमार उपस्थित होते. ते म्हणाले, उत्तर प्रदेश पोलीस या बलात्कार प्रकरणाचा तपास धिम्या गतीने करीत होते. सेनगरविरोधात बलात्कार प्रकरणी गुरुवारी एफआयआर दाखल करण्यात आला. हे प्रकरण व युवतीच्या वडिलांचा पोलीस कोठडीत असताना झालेला मृत्यू यांची चौकशी सीबाआयकडे सोपविण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतला आहे.
>भाजपाला घरचा अहेर
बलात्काराचा आरोप असलेल्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भाजपाच्या प्रवक्त्या दीप्ती भारद्वाज यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे करून घरचा अहेर दिला आहे. उत्तर प्रदेशला वाचवा, असे आवाहनही भारद्वाज यांनी शहा यांना केले आहे. उत्तर प्रदेश सरकारमुळे भाजपाला मान खाली घालावी लागत आहे, असेही भारद्वाज म्हणाल्या.
>दलित महिलेची हत्या
अमेठी : उत्तर प्रदेशमधील अमेठी जिल्ह्यातील एका गावात २२ वर्षीय दलित महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. बीएच्या पहिल्या वर्षात शिकत असलेल्या या युवतीचा मृतदेह तिच्या घरापासून शंभर मीटर अंतरावर आढळून आला. युवतीच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात येणार आहे.