Narendra Modi: राज्यात पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार? मोदींनी मुख्यमंत्र्यांना ऐकवलेच
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 02:01 PM2022-04-27T14:01:37+5:302022-04-27T14:13:52+5:30
Narendra Modi: लहान मुलांना कोरोना लस उपलब्ध झाली असून राज्यांनी आता लसीकरणावर लक्ष केंद्रीत करावे, असे आदेश मोदींनी दिले आहेत. याचबरोबर पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतींवरुनही राज्यांना सुनावले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोनाच्या वाढत्या संकटावर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी लहान मुलांना कोरोना लस उपलब्ध झाली असून राज्यांनी आता लसीकरणावर लक्ष केंद्रीत करावे, असे आदेश दिले आहेत. याचबरोबर पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतींवरुनही राज्यांना सुनावले आहे.
देशात मोठ्या काळानंतर शाळा सुरु झाल्या आहेत. अशातच मुलांच्या कुटुंबीयांच्या चिंता वाढू लागल्या आहेत. काही शाळांमध्ये विद्यार्थी संक्रमित झाले आहेत. आनंदाची बाब म्हणजे अधिकांश मुलांना कोरोनाची लस घेतली आहे. आता त्याहून कमी वयाच्या मुलांना लस उपलब्ध झाली आहे, असे मोदी म्हणाले.
यानंतर मोदी यांनी पेट्रोल, डिझेलवरून राज्यांना सुनावले आहे. यामुळे भाजपेतर राज्यांना मोठा धक्का बसला आहे. विरोधी पक्षांची ज्या राज्यांत सत्ता आहे, त्यांनी आपल्या राज्यातील जनतेला पेट्रोल, डिझेलच्या कमी झालेल्या किंमतींचा लाभ दिलेला नाही. या राज्यांनी इंधनाच्या दरात कपात केली नाही. व्हॅट कमी न करता या राज्यांनी फक्त लाभ मिळविला आहे. जागतिक संकटाच्यावेळी राज्यांनी आणि केंद्राने एकत्र येऊन पुढे जाण्याची गरज आहे, असे मोदी म्हणाले. यावेळी मोदी यांनी ज्या राज्यांनी पेट्रोल, डिझेलवरील कर कमी केला नाही त्यांची नावे घेतली.
यामध्ये महाराष्ट्राचाही नाव घेतले. दिवाळीमध्ये केंद्र सरकारने पाच रुपयांनी पेट्रोल, डिझेलवरील कर घटविले होते. यानंतर भाजपाची व मित्रपक्षांची ज्या ज्या राज्यांच सत्ता आहे, त्यांनी देखील व्हॅटमध्ये कपात करून जनतेला दिलासा दिला होता. मात्र, महाराष्ट्रासह अन्य राज्यांनी कर कपात केली नव्हती, केंद्राने जेवढा कर कमी केला तेवढाच काय तो दिलासा मिळाला होता. या आडमुठेपणावर आज मोदींनी बोट ठेवले आहे. यामुळे ज्या राज्यांच भाजपाची सत्ता आहे, त्या राज्यांतील इंधनाचे दर इतर राज्यांच्या तुलनेत खुपच कमी आहेत.