पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील 25 हजार संतांना लिहिणार पत्र; जाणून घ्या, कुठे बोलावणार? काय आहे इरादा?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 06:44 PM2021-11-28T18:44:15+5:302021-11-28T18:44:32+5:30
"यासाठी संत, आखाड्यांचे महंत, महामंडलेश्वर, मंदिरे आणि मठांचे प्रमुख यांना पाठवल्या जाणाऱ्या निमंत्रण पत्रांसाठी सर्व मठ, मंदिरे, आखाडे, पीठ आदींची यादी शासन व प्रशासन तयार करत आहे."
वाराणसी- सध्या उत्तर प्रदेश सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या वतीने एक निमंत्रण पत्रका तयार करण्याच्या कामात गुंतले आहे. हे निमंत्रण पत्र देशभरातील संतांना पाठविले जाणार असून त्यांना एका ठिकाणी बोलावण्यात येणार आहे. खरे तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काशी विश्वनाथ धाम या ड्रीम प्रोजेक्टच्या शुभारंभासाठी देशभरातील संतांना निमंत्रित करण्याची योजना आखली जात आहे. यासाठी काशीमध्ये येण्यासाठी तब्बल 25 हजार संतांना निमंत्रण पत्र पाठविले जाईल. यादरम्यान, संत मंडळींना काशीत झालेल्या बदलासंदर्भात माहिती दिली जाईल.
यावेळी, संतांना माहिती दिली जाईल, की कशा प्रकारे चिंचोळ्या गल्ल्यांतून काढून बाबा विश्वनाथ यांचा भव्य आणि दिव्य धाम तयार करण्यात आला आहे. याच बरोबर, बाबा विश्वनाथ धाम तयार करताना आलेली आव्हाने आणि शहरांत केलेल्या बदलांसंदर्भातही संत मंडळींना माहितीही दिली जाईल.
भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्रीही राहणार उपस्थित...
महत्वाचे म्हणजे, 13 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी श्री काशी विश्वनाथ धामचे उद्घाटन करणार आहेत. यासाठी भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार असून दुसरीकडे देशभरातील 200 हून अधिक महापौरही वाराणसीत उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर संत, आखाड्यांचे महंत, महामंडलेश्वर, मंदिरे आणि मठांचे प्रमुख यांना पाठवल्या जाणाऱ्या निमंत्रण पत्रांसाठी सर्व मठ, मंदिरे, आखाडे, पीठ आदींची यादी शासन व प्रशासन तयार करत आहे. या कार्यक्रमात देशभरातील सर्व संतांनी सहभागी व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते.
निवडणुकीच्या दृष्टीने फायदेशीर -
पंतप्रधान मोदींच्या वतीने देशभरातील संतांना पाठविले जाणारे हे पत्र उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही फायदेशीर ठरेल, असे मानले जात आहे. यामुळे भाजपच्या हिंदुत्वाच्या अजेंड्याला धार मिळेल. एवढेच नाही, तर सरकारकडून होत असलेल्या विकासकामांचीही लोकांना माहिती होईल. यामुळे निवडणुकीच्या काळात भाजपला नवी ताकद मिळेल.