'मग ST कर्मचाऱ्यांच्या डेथ सर्टीफिकेटवर मुख्यमंत्र्यांचा फोटो छापायचा का?'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 01:07 PM2021-12-03T13:07:13+5:302021-12-03T13:10:23+5:30
नगर जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, ज्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, मग त्यावरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो छापायचा का? असा प्रतिप्रश्न विखे पाटील यांनी केला आहे
नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांचं संसदेतील भाषण चर्चेचा विषय बनलं आहे. कोरोना विषयावरील चर्चासत्रात खासदार कोल्हेंनी तुफान फटकेबाजी करताना मोदी सरकारला लक्ष्य केले. तर, राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कामाचे कौतुकही केले. तर, मोदी सरकारवर जबरी टीका केली होती. कोल्हेंच्या या टीकेला आता भाजपा नेते आणि अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिलंय.
खासदार कोल्हेंनी कोरोना कालावधील मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची जबाबदारी मोदी सरकार घेणार का, असे म्हटले. डॉ. कोल्हेंनी मोदींना उद्देशून कवितेच्या माध्यमातून टोला लगावला.
"अगर जीत का सेहरा बंधवाना हो तो,
पराजय का बोझ भी स्वीकारना होगा"
'जर लसीकरण प्रमाणपत्रावर फोटो छापायचा असेल तर मृत्यू प्रमाणपत्राची जबाबदारी पण घ्यायला हवी', असे कोल्हेंनी म्हटले होते. कोल्हेंच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना, राज्यातील ST कामगारांच्या डेथ सर्टीफिकेटवर मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोटो छापायचा का? असा प्रतिप्रश्न केला एबीपी माझाशी बोलताना आहे.
अहमदनगरमध्ये झालेल्या अग्नितांडवात 12 रुग्ण मयत झाले. मग, ज्यांचे मृत्यू झाले त्यांच्या डेथ सर्टिफिकेटवर मग मुख्यमंत्र्यांचा फोटो छापायचा का?. नगर जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, ज्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, मग त्यावरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो छापायचा का? असा प्रतिप्रश्न विखे पाटील यांनी केला आहे. तसेच, राजकारण करणाऱ्यांना आम्ही जशास तसे उत्तर द्यायला कमी पडणार नाही. सरकारच्या काळातील आत्महत्येनुसार फोटो छापायला लागले तर सर्वात जास्त डेथ सर्टिफिकेटवर महाविकास आघाडी सरकारमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे लागतील, दुसरे कोणाचेही नाही, असे म्हणत सुजय विखे यांनी अमोल कोल्हेंच्या टीकेवरुन महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले.
तिन्ही नेत्यांना भारतरत्न द्यावा
राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमदील तिन्ही पक्षाच्या नेत्यांना प्रत्येकी एक-एक भारतरत्न द्यायला हवा, एवढं त्यांचं काम कौतुकास्पद आहे. यांनी ग्लोबल टेंडर काढलं होतं, एक तरी लस विकत घेतली का? असा सवाल सुजय विखेंनी विचारला. संसदेत काल बुस्टर डोसची चर्चा झाली, त्यावर स्वत: WHO ने बुस्टर डोसची गरज नसल्याचं म्हटलं आहे. तसेच, खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेलाही सुजय विखे यांनी प्रत्युत्तर दिलं.