'यामुळे' मोदींच्या नव्या मंत्रीमंडळातून माजी कृषीमंत्री राधामोहन सिंह यांना डच्चू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 04:44 PM2019-06-01T16:44:34+5:302019-06-01T16:45:47+5:30
मागील कार्यकाळात देशातील सर्वात महत्त्वाचे खाते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राधामोहन सिंह यांच्याकडे सोपविले होते. मात्र यावेळी राधामोहन सिंह यांना मंत्रीमंडळात देखील स्थान मिळाले नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रीमंडळाची स्थापना झाली असून शपथविधी पार पडला आहे. परंतु, नव्या सरकारमध्ये कृषीमंत्रालाची जबाबदारी नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. कृषीप्रधान देशातील सर्वात महत्त्वाचे असलेले कृषीमंत्रालय मोदींच्या पहिल्या कार्यकाळात राधामोहन सिंह यांच्याकडे होते. एवढं महत्त्वाचं मंत्रालय सांभाळणाऱ्या राधामोहन सिंह यांना यावेळी मंत्रीमंडळात देखील स्थान मिळाले नाही.
मागील कार्यकाळात देशातील सर्वात महत्त्वाचे खाते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राधामोहन सिंह यांच्याकडे सोपविले होते. मात्र यावेळी राधामोहन सिंह यांना मंत्रीमंडळात देखील स्थान मिळाले नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्याची कारणं देखील तशीच आहेत. राधामोहन सिंह बिहारमधून खासदार आहेत. परंतु, बिहार भाजपलाच राधामोहन सिंग मंत्री नको होते, असं सांगण्यात येत आहे.
२०१९ लोकसभा निवडणुकीत राधामोहन सिंह यांच्या मतदारसंघात अमित शाह यांनी सभा घेतली होती. त्यावेळी ते म्हणाले होते की, तुमच्या खासदाराने काम केलं की नाही, हे न पाहता, मोदींना पंतप्रधान बनवायचे आहे, या उद्देशाने उमेदवाराला निवडून द्या. त्याच दिवशी राधामोहन यांच्याविषयी अमित शाह यांचे काय मत आहे, हे निश्चित झाले होते. कृषीमंत्री असताना राधामोहन सिंह बिहारमध्ये अनेक योजना आणू शकत होते. परंतु, त्यांनी तस काहीही केलं नाही. तसेच जे काही थोडेफार प्रकल्प बिहारला नेले ते आपल्या मतदार संघापूरतेच ठेवले. त्यामुळे भाजपमधील अनेक नेते त्यांच्यावर नाराज होते.
दुसरे कारण म्हणजे २०१९ लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोतिहारीमध्ये सभा निश्चित करण्यात आली होती. परंतु, ती सभा रद्द करून चंपारणमध्ये घ्यावी लागली. २०१४ मध्ये राधामोहन सिंह यांच्या प्रचारासाठी आलेल्या मोदींनी घोषणा केली होती, की मोतिहारीमधील साखर कारखान्यातून उत्पादन सुरू होईल. मात्र कृषीमंत्री असताना देखील राधामोहन सिंह यांनी त्यासाठी हालचाल केली नाही. त्यामुळे मोदींनी मोतिहारीमध्ये सभा घेण्याची हिंमत दाखवली नाही. त्याचवेळी राधामोहन सिंह यांच्याविषयीचे मोदींचे मत बदलले होते.
दरम्यान मोतिहारीमध्ये साखर कारखान्याच्या हायवेलगतच्या जमिनीची विक्री करण्यात आली. यात भाजपच्या बड्या नेत्याचा हात असल्याचे चर्चा होती. त्यातच काही दिवसांपूर्वी साखर कारखान्यातील कामगारांनी आत्महत्या केल्या होत्या. त्यामुळे येथे मोठा असंतोष निर्माण झाला होता. तसेच राधामोहन सिंह यांचे वय आता ७० च्या पुढे गेले आहे. त्यामुळे देखील त्यांना मंत्रीमंडळातून डिच्चू मिळाल्याची चर्चा भाजपच्या गोटात आहे.