जवानांचे हकनाक बळी का द्यावेत?
By admin | Published: May 29, 2017 05:15 AM2017-05-29T05:15:44+5:302017-05-29T05:15:44+5:30
काश्मीरमधील दहशतवादग्रस्त गंभीर परिस्थितीशी मुकाबला करणाऱ्या अधिकारी व जवानांचे मनोधैर्य उंचावणे हे लष्करप्रमुख म्हणून माझे कर्तव्य
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : काश्मीरमधील दहशतवादग्रस्त गंभीर परिस्थितीशी मुकाबला करणाऱ्या अधिकारी व जवानांचे मनोधैर्य उंचावणे हे लष्करप्रमुख म्हणून माझे कर्तव्य आहे. परिस्थिती कितीही कठीण असली, तरी ‘संयम बाळगा आणि हकनाक मरा’ असे मी जवानांना सांगू शकत नाही, अशी स्पष्ट व कणखर भूमिका लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी घेतली आहे.
अनंतनाग जिल्ह्यात फारुख अहमद दर या नागरिकास लष्करी जीपच्या बॉनेटला बांधून गावांमधून ‘मानवी ढाली’प्रमाणे फिरविणारे राष्ट्रीय रायफल्सचे मेजर नितीन लितुल गोगोई यांना पुरस्कार देण्यावरून होणारी टीका व काश्मीरमधील परिस्थिती, याविषयी जनरल रावत यांनी ‘पीटीआय’शी बोलताना आपली भूमिका परखडपणे मांडली. जनरल रावत म्हणाले की, काश्मीरमध्ये छुपे युद्ध सुरू आहे. छुुपे युद्ध घाणेरडे युद्ध असते. शत्रू आमने-सामने येऊन खुलेपणाने लढतो, तेव्हा ते लढण्याचे काही नियम असतात, परंतु छुपे युद्ध तसे नसते. नावीन्यपूर्ण डावपेचांनीच छुपे युद्ध लढावे लागते.
‘कोर्ट आॅफ इन्क्वायरी’चा अहवाल येण्यापूर्वीच मेजर गोगोई यांना प्रशस्तिपत्र देण्याचे समर्थन करताना, लष्करप्रमुख म्हणाले की, काश्मीरमध्ये अत्यंत प्र्रतिकूल परिस्थितीशी मुकाबला करणाऱ्या तरुण अधिकाऱ्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठीच आपण त्यांना पुरस्कृत केले, ते गरजेही होते.
ते म्हणाले की, सैन्यदलाचे मनोबल सदैव उच्च राहील, हे पाहणे माझे काम आहे. मी प्रत्यक्ष युद्धभूमीपासून दूर असतो व तेथील परिस्थितीवर माझे नियंत्रण नसते. त्यामुळे ‘मी तुमच्या पाठीशी
आहे’, एवढेच मी जवानांना सांगू शकतो. त्यामुळे मी सैनिकांना नेहमी हेच सांगत असतो की, चुका होतील, पण त्या चुकीमागे तुमचा हेतू वाईट नसेल तर मी तुमच्या पाठीशी आहे.
मेजर गोगोई यांना दंडित करावे, असे त्यांनी काय केले, असा प्रश्न उपस्थित करून रावत म्हणाले, सशस्त्र दलांनाही स्वसंरक्षणाचा अधिकार आहे. त्यानुसार जमावावर गोळीबीर करण्याचा पर्यायही गोगोई यांना उपलब्ध होता. पण त्यांनी तसे केले नाही. त्यांच्याविरुद्धच्या ‘कोर्ट आॅफ इन्क्वायरी’चा अहवाल तयार झाला नसला तरी त्याचा रोख काय आहे याची मला कल्पना आहे. म्हणूनच मी त्यांना प्रशंसापत्र देण्याचा निर्णय घेतला.
रजेवर असलेले तरुण लष्करी अधिकारी लेफ्टनंट उमर फैयाज यांची दहशतवाद्यांनी हत्या केली, तेव्हा एवढा गहजब का केला नाही, यावरही त्यांनी आशचर्य व्यक्त केले. काश्मीरमधील परिस्थिती गुंतागुंतीची असल्याचा संदर्भ देत रावत असेही म्हणाले, तेथे निदर्शकांनी दगडफेक करण्याऐवजी गोळीबार केला असता तर सशस्त्र दलांचे काम सोपे झाले असते. तसे झाले असते स्थितीत मला (लष्कराला) जे काही करायचे ते (मोकळेपणाने) करता आले असते. संपूर्ण काश्मीर नियंत्रणाबाहेर गेले आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. अस्थिरता दक्षिण काश्मीरच्या फक्त चार जिल्ह्यांत आहे.
लष्कराची जरब हवीच
जनरल रावत म्हणाले : लोकांना लष्कराचा धाक न राहिल्यास देशाचे भवितव्य धोक्यात येते. सैन्यदळांचा धाक शत्रूप्रमाणेच देशातील नागरिकांनाही वाटायला हवा. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आम्हाला पाचारण केले जाते, तेव्हा लोकांवर आमची जरब बसायलाच हवी.
दहशतवाद्यांचा कुटिल डाव
अनंतनागमधील घटनेच्या संदर्भात लष्करप्रमुख म्हणाले की, विविध सुरक्षा दलांमधील परस्पर विश्वासाला तडा देण्याचा कुटिल डाव तेथे खेळला जात होता. निवडणूक अधिकाऱ्यांनी सुरक्षेसाठी बोलावले, तेव्हा मेजर गोगोई नकार देऊ शकत नव्हते.
उद्या अनंतनागमध्ये निवडणूक होईल, तेव्हाही पुन्हा अशाच घटना घडू शकतात. त्या वेळी सुरक्षेसाठी बोलावल्यावर लष्कर तेथे धावून गेले नाही, तर आम्ही ज्यांचे रक्षण करणे अपेक्षित आहे, ते सामान्य नागरिक, पोलीस व लष्कर यांच्यात दुरावा निर्माण होेईल. दहशतवाद्यांना नेमके तेच हवे असल्याने, तसे होऊ दिले जात नाही.
लोक दगड, पेट्रोल बॉम्ब फेकत आहेत. अशा परिस्थितीत आम्ही काय करावे, असे माझ्या जवानांनी मला विचारले, तर ‘वाट पाहा आणि मरा’ असे मी त्यांना सांगावे का? की, ‘काळजी करू नकोस, मी तिरंग्यात गुंडाळून एक छान शवपेटिका घेऊन येईन आणि तुमचे मृतदेह मी सन्मानाने घरी पाठवीन,’ असे सांगू? लष्करप्रमुख म्हणून मी असे सांगणे अपेक्षित आहे का? नाही. तेथे लढणाऱ्या जवानांचे मनोधैर्य उंचावणे हे माझे कर्तव्य आहे. - जनरल रावत
प्रश्न: काश्मीरच्या जनतेचे मन जिंकण्यासाठी राजकीय पुढाकार घ्यायला हवा, असे वाटते का?
जनरल रावत : याविषयीचा निर्णय सरकारने घ्यायचा आहे, पण यापूर्वी असा राजकीय पुढाकार घेतला गेला नव्हता, असे नाही, पण त्याचा परिणाम काय झाला? त्यानंतर कारगील झाले!
प्रश्न : तुमच्या मते काश्मीर समस्येवर तोडगा काय असू शकतो?
जनरल रावत : जो काढायचा तो समन्वित तोडगा काढावा लागेल. त्यात प्रत्येकाला सहभागी करून घ्यावे लागेल. त्यात, हिंसाचार होऊ न देणे व ज्याचा या हिंसाचाराशी संबंध नाही, त्या सामान्य नागरिकाचे रक्षण करणे, एवढेच लष्कराचे काम आहे.