आम्ही शालेय विद्यार्थ्यांना दंगलीबाबत का शिकवावे? : पाठ्यपुस्तकांच्या भगवेकरणाचा आरोप संचालकांनी फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 01:21 PM2024-06-17T13:21:53+5:302024-06-17T13:22:13+5:30

"आम्हाला हिंसक नव्हे चांगले नागरिक घडवायचे आहेत."

Why should we teach school students about riots | आम्ही शालेय विद्यार्थ्यांना दंगलीबाबत का शिकवावे? : पाठ्यपुस्तकांच्या भगवेकरणाचा आरोप संचालकांनी फेटाळला

आम्ही शालेय विद्यार्थ्यांना दंगलीबाबत का शिकवावे? : पाठ्यपुस्तकांच्या भगवेकरणाचा आरोप संचालकांनी फेटाळला

 लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : दंगलीबद्दल शिकवल्याने हिंसक व वैफल्यग्रस्त नागरिक निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शालेय पाठ्यपुस्तकांतील गुजरात दंगल, बाबरी मशीद संबंधित संदर्भ सुधारण्यात आले आहेत, असे राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे (एनसीईआरटी) संचालक दिनेश प्रसाद सकलानी यांनी स्पष्ट केले. शालेय अभ्यासक्रमाचे भगवेकरण केल्याचा आरोपही त्यांनी 
फेटाळून लावला. 

पाठ्यपुस्तकांतून गुजरात दंगल व बाबरी मशीद संदर्भातील बदलाबाबत छेडले असता सकलानी म्हणाले की, आम्ही शालेय विद्यार्थ्यांना दंगलीबाबत का शिकवावे? आम्हाला हिंसक आणि नैराश्यग्रस्त नागरिक नाही तर सकारात्मक नागरिक घडवायचे आहेत.  शालेय पाठ्यपुस्तकांतून त्यांना हे धडे का द्यावेत? विद्यार्थ्यांनी आक्रमक व्हावे, समाजात द्वेष निर्माण करावा आणि स्वत:ही द्वेषाला बळी पडावे अशा पद्धतीने आपण त्यांना शिकवायचे काय? आपण बालकांना दंगलीबाबत शिकवले पाहिजे का... ते जेव्हा मोठे होतील तेव्हा ते याबाबत शिकू शकतात; परंतु शालेय पाठ्यपुस्तकांतून त्यांना हे धडे का द्यावेत? मोठे झाल्यानंतर त्यांना हे समजू द्या की काय झाले, का झाले. बदलांबाबत ओरड करणे  अनावश्यक आहे.

पुस्तकात नवीन काय?
अनेक संदर्भ वगळून आणि बदलांसह नवी पाठ्यपुस्तके बाजारात आली. तेव्हा सकलानी यांनी त्यांची भूमिका मांडली. इयत्ता १२ वीच्या राज्यशास्त्राच्या सुधारित पाठ्यपुस्तकात बाबरी मशिदीचा थेट उल्लेख नाही. त्याला मशिदीऐवजी तीन घुमटाचा ढाचा असेे संबोधण्यात आले आहे. अयोध्या वादावरचा इतिहास चार पानांवरून दोन पानांवर आणला गेला आहे.  आधीच्या आवृत्तीतील तपशील वगळण्यात आला आहे. सुधारित धड्यात राम मंदिर उभारणीचा मार्ग प्रशस्त करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे दिसते. न्यायालयाचा हा निर्णय देशात व्यापक प्रमाणात स्वीकारण्यात आला होता. 

आम्हाला सकारात्मक नागरिक घडवायचे आहेत. आम्ही त्यात सर्वकाही ठेवू शकत नाही. आमच्या शिक्षणाचा उद्देश हिंसक आणि नैराश्यग्रस्त नागरिक घडवणे हा नाही. द्वेष आणि हिंसाचार हे शिकवण्याचे विषय नाहीत. आमची पाठ्यपुस्तके त्यावर केंद्रित असू नयेत. १९८४ च्या दंगलीचा पुस्तकांमध्ये उल्लेख नसल्यावरून असा गदारोळ होत नाही.      
- दिनेश प्रसाद सकलानी, संचालक, एनसीईआरटी

काय वगळले ?
भाजपची गुजरातमधील सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा, कारसेवकांची भूमिका, बाबरी मशीद पाडल्यानंतर उसळलेला जातीय हिंसाचार, भाजपशासित राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट आणि भाजपने अयोध्येतील घटनांबद्दल खेद व्यक्त करणे आदी संदर्भ पाठ्यपुस्तकांमधून वगळण्यात आले आहेत.

हे भगवेकरण कसे ?
- काही गोष्ट अप्रासंगिक झाली असेल तर... ती बदलावी लागेल. ती का बदलू नये. मला येथे भगवेकरण दिसत नाही. आम्ही इतिहास शिकवतो. त्यामुळे वस्तुस्थिती कळते.
- आपण भारतीय ज्ञानप्रणालीबद्दल सांगत आहोत, तर ते भगवेकरण कसे असू शकते? जर आपण मेहरौलीतील लोखंडी खांबाबद्दल सांगत आहोत आणि भारतीय हे धातूविज्ञान शास्त्रज्ञापेक्षा पुढे आहेत असे म्हणत आहोत, तर आपण चुकीचे काय सांगतोय ? हे भगवेकरण कसे असू शकते?"

Web Title: Why should we teach school students about riots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.