Corona Vaccination: दिल्लीत व्हॅक्सिन नाही, न्यायालयाची केंद्राला नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 06:07 AM2021-06-03T06:07:18+5:302021-06-03T06:07:39+5:30
व्हॅक्सिन नसताना इतकी लसीकरण केंद्रे का उघडली? दिल्ली सरकारची कानउघाडणी
- विकास झाडे
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनचा तुटवडा असल्याने प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयाकडे गेले आहे. न्यायालयाने यासंदर्भात केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. तुमच्याकडे व्हॅक्सिन नव्हते तर इतकी लसीकरण केंद्रे सुरू करण्याची गरज काय होती? असा सवाल केला आहे.
गेले काही दिवस दिल्ली कोव्हॅक्सिनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. दिल्ली सरकारने १८ ते ४४ या वयोगटासाठी सुरू केलेली ३०० लसीकरण केंद्रे दोन-तीन दिवसांतच बंद करावी लागली होती, तर कोविशिल्डही केंद्र सरकारकडून उपलब्ध होत नाही. गत महिनाभरापासून यासाठी दिल्ली सरकार आणि केंद्रामध्ये विवाद सुरू आहेत.
न्यायमूर्ती रेखा पल्ली यांनी दिल्ली सरकारला नोटीस पाठवून विचारले की, कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतलेल्यांना त्यांची सहा आठवड्यांची मुदत संपण्याआधी दुसरा डोस तुम्ही देऊ शकता का? जर तुमच्याकडे व्हॅक्सिन उपलब्ध नव्हते तर गाजावाजा करीत इतकी लसीकरण केंद्रे सुरू करण्याचे काय कारण होते? असे अनेक प्रश्न दिल्ली सरकारला विचारण्यात आले आहेत.
दिल्लीचा पॉझिटिव्हिटी दर घसरला!
गेल्या दोन महिन्यांत पहिल्यांदाच दिल्लीचा पॉझिटिव्हिटी दर एक टक्क्यापेक्षा कमी झाला आहे. गेल्या २४ तासांत हा दर ०.७८ टक्के नोंदविण्यात आला. ७३ हजार ४५१ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ५७६ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दिल्लीत सद्य:स्थितीत बाधितांची संख्या ९ हजार ३६४ असून, गेल्या २४ तासांमध्ये मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १०३ आहे.