काश्मीरमधील कलम 370 ची तात्पुरती तरतूद 'राजकारणा'मुळे 70 वर्षे राहिली; एस. जयशंकर यांचा विरोधी पक्षांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 08:24 AM2022-11-03T08:24:31+5:302022-11-03T08:41:22+5:30
S Jaishankar : पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील आयआयएमच्या विद्यार्थ्यांशी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी संवाद साधला.
कोलकाता : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी जम्मू-काश्मीरमधून (Jammu-Kashmir) कलम 370 (Article 370) हटवण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावरून विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे. राजकीय मजबुरी देशाच्या सीमांना धोका पोहोचवणारी किंवा देशाच्या हिताला बाधक ठरू नये, असे एस. जयशंकर म्हणाले. तसेच, विरोधी पक्षांवर टीका करताना एस. जयशंकर यांनी सवाल केला की, जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 सारखी तात्पुरती तरतूद दीर्घकाळ सुरू ठेवण्यामागे राजकारणाशिवाय दुसरे काय कारण आहे?
पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील आयआयएमच्या विद्यार्थ्यांशी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी संवाद साधला. यावेळी एस. जयशंकर म्हणाले की, कलम 370 अंतर्गत जम्मू-काश्मीरसाठी केलेली तात्पुरती तरतूद 'राजकारणा'मुळे 70 वर्षांहून अधिक काळ राहिली. राष्ट्रहिताला प्राधान्य देणे सर्वात महत्त्वाचे आहे. देशाच्या मोठ्या हिताला बाधा पोहोचेल, असे राजकारण करू नये. हा सर्व नेत्यांचा पहिला दृष्टिकोन असला पाहिजे.
आपल्या सीमांना धोका निर्माण करणारे राजकारण होऊ नये. 2019 मध्ये कलम 370 रद्द करण्याबाबत तात्पुरती तरतूद इतके दिवस टिकण्यासाठी राजकारणाशिवाय दुसरे कारण काय आहे, असा सवाल एस. जयशंकर यांनी केला. तसेच, खरं म्हणजे इथे गोष्टी इतक्या अव्यवस्थित होत्या की जगाने त्याचा वापर केला. देशाच्या राजकारणावर परिणाम होत असल्याने या मुद्द्यावर जनमत तयार करण्याची गरज असल्याचे एस. जयशंकर म्हणाले.
It is important to put national interest first. Politics of the day should not hamper large interest of the nation. It should not lead our borders to be vulnerable. To some extent, we've to create the culture and to some extent, the public opinion on this should come: EAM (02.11) pic.twitter.com/lLRojpjs40
— ANI (@ANI) November 3, 2022
पाकिस्तानला एफ-16 सारखी लढाऊ विमाने दिल्याच्या मुद्द्यावर एस. जयशंकर यांनी भाष्य केले. ते म्हणाले, 'जर तुम्ही गेल्या 75 वर्षांचा विचार केला तर अशा पावलांनी लष्करी हुकूमशाहीला प्रोत्साहन देण्याशिवाय काहीही केले नाही'. तसेच, पाकिस्तानचे नाव न घेता, त्यांनी शेजारी असलेल्या देशाला आपल्या सीमेबाहेर दहशतवादाला पाठिंबा दिल्याच्या परिणामांचे 'मूल्यांकन' करण्यास सांगितले.
याचबरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये मंत्री म्हणून सामील होण्यापूर्वी अनेक दशके मुत्सद्दी म्हणून काम केलेले एस. जयशंकर म्हणाले की, जागतिक स्तरावर भारताला आता पूर्वीपेक्षा जास्त महत्त्व आहे. आज भारताकडे नेतृत्व आणि दूरदृष्टी तसेच चिकाटी आणि आपले जागतिक स्थान उंचावण्यासाठी वचनबद्धता आहे.