अनंतनागमध्ये आतापर्यंत का पूर्ण होऊ शकलं नाही ऑपरेशन? दहशतवादी अशी देताहेत हुलकावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 10:00 AM2023-09-18T10:00:23+5:302023-09-18T10:00:53+5:30
Anantnag Encounter: जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात १३ सप्टेंबरपासून सुरू असलेली चकमक सहाव्या दिवशीही सुरू आहे. सलग सहा दिवस मोहीम चालल्यानंतरही दहशतवाद्यांचा बीमोड करणं अद्याप का शक्य झालेलं नाही, याचं कारण पुढीलप्रमाणे समोर येत आहे.
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात १३ सप्टेंबरपासून सुरू असलेली चकमक सहाव्या दिवशीही सुरू आहे. गडोले कोकेरनाग येथे ज्या ठिकाणी दहशतवादी लपलेले आहेत तिथे लष्कराचे जवान सतर्क राहून मोहीम चालवत आहेत. लष्कराकडून दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला जात आहे. तसेच रॉकेट लॉन्चरच्या मदतीने बॉम्बची बरसात केली जात आहे. केवळ गोळीबारच नाही तर लष्कराने दहशतवाद्यांना लपलेल्या ठिकाणांहून बाहेर काढण्यासाठी आणखी एक पद्धत अमलात आणली आहे. दहशतवादी गुहेमध्ये लपले असल्याचा जवानांना संशय आहे. त्यामुळे या गुहांना आग लावण्यात आली आहे. मात्र सलग सहा दिवस मोहीम चालल्यानंतरही दहशतवाद्यांचा बीमोड करणं अद्याप का शक्य झालेलं नाही, याचं कारण पुढीलप्रमाणे समोर येत आहे.
गुहेला आग लावण्यामागचं कारण म्हणजे जर या गुहेमध्ये दहशतवादी लपलेले असतील तर ते धुरामुळे गुदमरतील किंवा उष्णता वाढल्याने बाहेर येतील त्यामुळे त्यांना लक्ष्य करता येईल. काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी अभियानामध्ये ही आतापर्यंतची सर्वात दीर्घकाळ चाललेली मोहीम ठरली आहे. हे ऑपरेशन लवकरात लवकर संपवण्याचा लष्कराचा प्रयत्न आहे. त्यासाठी लष्कर आधीच्यापेक्षा आक्रमकपणे कारवाई करत आहे. लष्कराने पीर पंजाल पर्वतांवहरी आपल्या हल्ल्यांचा वेग वाढवला आहे.
त्याशिवाय जम्मू-काश्मीर जम्मू-काश्मीर पोलिसांनी कोकेरनाग येथे एक कमांड सेंटरही बनवलं आहे. तिथून त्यांनी ऑपरेशनची लाईव्ह फिड मिळत आहे. या ऑपरेशनचा हा सहावा दिवस आहे. रविवारी लष्कराने दहशतवाद्यांचं लोकेशन ट्रॅक केलं. तसेच त्यांच्या ठिकाणांवर मोठ्या प्रमाणावर गोळीबार करण्यात आला. या कारवाईमध्ये लष्कराने आपले हायटेक ड्रोन सिस्टिम आणि ग्रेनेड लाँचर्सचा वापर केला.
कोकेरनाग परिसरामध्ये ज्या प्रकारे दहशतवादी लपलेले आहेत, तिथे लष्कर डोळ्यात तेल घालून पहारा करत आहेत. आपलं वाचणं कठीण असल्याची जाणीव दहशतवाद्यांना आहे. अशा परिस्थितीत ते घनादाट जंगलांमध्ये गुहांचा आसरा घेऊन लपून बसलेले आहेत. मात्र दहशतवादी अजूनही जिवंत आहेत कारण ते उंचावर लपलेले आहेत. तसेच हे जंगल घनदाट आहे. त्यामुळे दहशतवादी कुठे लपले आहेत. याचा शोध घेणं हे मोठं आव्हान आहे.