उद्घाटनासाठी पंतप्रधानांची वाट का पाहायची? दिल्लीतील 'फ्री वे' बाबत सर्वोच्च न्यायालयाची विचारणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2018 03:16 PM2018-05-10T15:16:02+5:302018-05-10T15:16:02+5:30
दिल्लीतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बांधण्यात आलेल्या रस्त्यांचे उद्घाटन अद्याप प्रलंबित आहे.
नवी दिल्ली- दिल्लीमधील प्रदुषण आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी केंद्र सरकारने काही पावले उचलली आहेत. त्यामध्ये सहा मार्गिका असणाऱ्या एक्स्प्रेस वे चा समावेश आहे. या मार्गावरुन दोन लाख वाहने जाऊ शकणार आहेत. मोठे ट्रक्स आणि मालाची वाहतूक करमारी सर्व वाहनांचा या मार्गावरुन प्रवास झाल्यामुळे ते राजधानी दिल्लीत जाण्याऐवजी बाहेरच्या बाहेर जाऊ शकतात. इस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवेमुळे सुद्धा वाहतुकीवरचा ताण कमी होणार आहे. एप्रिलमध्ये या मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार होते.
दिल्लीच्या प्रदुषणाबाबत दाखल झालेल्या एका खटल्याबाबत सर्वो्चच न्यायालयाचे न्यायाधीश मदन बी लोकूर आणि दीपक गुप्ता यांनी या मार्गांचे उद्घाटन अजून का झालेले नाही असा प्रश्न विचारला. त्याच्या उद्घाटनासाठी आपण पंतप्रधानांची का वाट पाहात आहोत? असेही त्यांनी विचारले. मेघालय उच्च न्यायालय सरकारी उद्घाटनाशिवाय पाच वर्षे काम करत आहे मग इस्टर्न कॉरिडॉर साठी का थांबलो आहोत अशा शब्दांमध्ये कोर्टाने संताप व्यक्त केला. 31 मे पूर्वी हा मार्ग उद्घाटन होऊन किंवा उद्घाटनाशिवाय सुरु झाला पाहिजे असे कोर्टाने नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडियाला सांगितले. दिल्लीही आधीच वाहतूक कोंडीच्या ताणाखाली आहे त्यामुळे त्याच्या उद्घाटनासाठी कोणत्याही प्रकारचा विलंब नागरिकांच्या हिताचे नाही.
या रस्त्याचे उद्घाटन 29 एप्रिल रोजी पंतप्रधानांच्या हस्ते होणार होते मात्र ते होऊ शकले नाही नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या वकिलांनी सांगितले.