झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून चंपई सोरेन यांची निवड का करण्यात आली? ही आहेत मोठी कारणे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 10:34 PM2024-01-31T22:34:31+5:302024-01-31T22:35:41+5:30
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजभवन गाठून राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यांच्या जागी आता चंपई सोरेन राज्याचे नवीन मुख्यमंत्री असतील. कालपर्यंत हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन याही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होत्या, पण शेवटी असे काय घडले की विधीमंडळ पक्षाने चंपई सोरेन यांना मुख्यमंत्रिपदासाठी निवडले.
चंपई सोरेन हे शिबू सोरेन यांच्या जवळचे मानले जातात. वेगळ्या झारखंड राज्याची मागणी झाल्यावर ते शिबू सोरेन यांच्यासोबत आंदोलनात सामील झाले. या चळवळीत मोठी भूमिका बजावल्याबद्दल त्यांना 'झारखंड टायगर' असेही संबोधले जाते. सध्याच्या सरकारमध्ये ते परिवहन मंत्री आहेत. त्यांच्या कामाचे खूप कौतुक होत आहे.
मोठी बातमी! झारखंड मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा राजीनामा; चंपई सोरेन नवे CM
चंपई सोरेन झारखंड मुक्ती मोर्चाच्या उपाध्यक्ष आहेत. त्यांना प्रशासनाचाही चांगला अनुभव आहे. सर्वप्रथम त्यांना अर्जुन मुंडा यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री करण्यात आले. ११ सप्टेंबर २०१० ते १८ जानेवारी २०१३ पर्यंत ते मंत्री होते. यानंतर राष्ट्रपती राजवट लागू झाली आणि त्यानंतर झामुमोचे सरकार स्थापन झाले.
या सरकारमध्ये त्यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदासह परिवहन मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. २०१९ मध्ये हेमंत सोरेन यांचे सरकार पुन्हा स्थापन झाले तेव्हा त्यांना परिवहन, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती आणि मागासवर्गीय कल्याण मंत्री करण्यात आले.
चंपई सोरेन यांना तळागाळातील नेते मानले जातात. लोकांच्या सुख-दु:खात ते पाठीशी उभे असतात. ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर देखील खूप सक्रिय आहेत आणि फक्त एका ट्विटने लोकांच्या समस्या सोडवतात. हे त्यांनी अनेकदा दाखवून दिले आहे. कोल्हाण परिसरात त्यांची चांगली पकड आहे. बहुधा या कारणांमुळेच त्यांची झारखंडचे पुढील मुख्यमंत्री म्हणून निवड झाली.