भगवान जगन्नाथाचे रत्न भांडार का उघडले? पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद नाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 05:25 AM2023-08-07T05:25:12+5:302023-08-07T05:25:27+5:30
अलीकडेच पुरी येथील जगन्नाथ मंदिराच्या व्यवस्थापकीय समितीने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणला (एएसआय) रत्न भांडार उघडण्यास आणि दुरुस्ती करण्यास परवानगी देण्याची ओडिशा सरकारला शिफारस करण्याची घोषणा केली.
- अंबिका प्रसाद कानुनगो
लोकमत न्यूज नेटवर्क
भुवनेश्वर : भगवान जगन्नाथाचे रत्न भांडार उघडण्यासंबंधीच्या घडामोडींवर पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शंकराचार्य म्हणाले की, व्यवस्थापकीय समिती, एसजीटीए, ओडिशा सरकार किंवा अन्य कोणीही माझे मत जाणून घेतलेले नसल्यामुळे मी या विषयावर बोलणे योग्य होणार नाही.
अलीकडेच पुरी येथील जगन्नाथ मंदिराच्या व्यवस्थापकीय समितीने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणला (एएसआय) रत्न भांडार उघडण्यास आणि दुरुस्ती करण्यास परवानगी देण्याची ओडिशा सरकारला शिफारस करण्याची घोषणा केली. त्यावर शंकराचार्य म्हणाले की, मला अंधारात दगड मारायचे नाहीत. मला व्यवस्थापकीय समितीकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. समिती, ओडिशा सरकार आणि सेवकांना माझ्यापासून दूर राहायचे आहे. त्यामुळे सर्व बाबी जाणून घेतल्याशिवाय बोलणे योग्य नाही.
यासंबंधीच्या निर्णयानुसार, पुढील वर्षी रथयात्रेदरम्यान दुरुस्तीच्या कामासाठी रत्न भांडार उघडण्यात येणार आहे. एएसआयने एसजेटीएच्या मुख्य प्रशासकांना पत्र लिहून रत्न भांडाराची पाहणी करावी, असे म्हटले होते. रथयात्रेच्या वेळी जगन्नाथ गुंडीचा मंदिरात नऊ दिवसांच्या मुक्कामावर असताना भांडाराची पाहणी करावी, असे यात म्हटले होते.
आधुनिक सर्वेक्षण यंत्रणा वापरणार
n समितीने पुढील रथयात्रेच्या वेळी एएसआयला रत्न भांडाराची पाहणी करण्याची परवानगी देण्यासाठी राज्य सरकारला शिफारस पत्र पाठविण्याची सहमती दर्शविली.
n एक तांत्रिक समिती स्थापन करण्यात येणार असून, यात व्यवस्थापकीय समिती, काही सेवक असतील व ते रत्न भांडारच्या स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी आधुनिक सर्वेक्षण यंत्रणा वापरतील.