मलिक यांचे राज्यपाल असताना मौन का हाेते? अमित शाह यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 06:06 AM2023-04-23T06:06:07+5:302023-04-23T06:06:39+5:30
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा सवाल
नवी दिल्ली : जम्मू- काश्मीरमधील गैरप्रकारांबद्दल तेथील तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याकडे काही माहिती होती, तर त्याबद्दल त्यांनी आपल्या कारकीर्दीत बोलायला हवे होते. मलिक आता जम्मू- काश्मीरच्या मुद्यांवर का बोलत आहेत, असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. मलिक यांच्या दाव्यांची विश्वासार्हता तपासण्याची गरज आहे, असेही अमित शाह यांनी सांगितले.
सीआरपीएफच्या जवानांना हवाई प्रवासास केंद्र सरकारने अनुमती दिली नाही. त्यामुळे या जवानांना रस्त्याने प्रवास करावा लागला. त्यादरम्यान पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. मोदी सरकारच्या निष्काळजीपणामुळेच ही घटना घडल्याचा आरोप मलिक यांनी नुकताच एका मुलाखतीत केला होता. जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल असताना दोन फाइल मंजूर करण्यासाठी आपल्याला ३०० कोटी रुपयांची लाच देण्याची काही जणांनी तयारी दाखविल्याचा आरोपही मलिक यांनी यापूर्वी केला हाेता.
‘काहीही दडविण्याची आवश्यकता नाही’
सत्यपाल मलिक यांनी भाजपविरोधातील पक्षाशी हातमिळवणी केल्याची चर्चा आहे. त्याबाबत शाह म्हणाले की, मलिक हे दीर्घकाळ भाजपमध्ये कार्यरत आहेत. मात्र, लोकांमध्ये वेळोवेळी बदल होत असतात. या साऱ्या गोष्टींचा मतदारांनी बारकाईने विचार केला पाहिजे. भाजपला कोणतीही गोष्ट दडवून ठेवण्याची आवश्यकता वाटत नाही. मात्र, काही मुद्यांची सार्वजनिक व्यासपीठावर चर्चा होणे योग्य नाही.