आम्ही तुम्हाला हिशेब का देऊ? अमित शहा यांचा राहुल यांना टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 05:01 AM2018-06-11T05:01:30+5:302018-06-11T05:01:30+5:30
तुमच्या पक्षाने ५५ वर्षे आणि तुमच्या घराण्याने चार पिढ्या राज्य करूनही देशाचा काही विकास केला नाही. तेव्हा आम्ही गेल्या चार वर्षांत काय काम केले याचा हिशेब आम्ही तुम्हाला देण्याची गरज नाही
सुरगुजा (छत्तीसगढ) - तुमच्या पक्षाने ५५ वर्षे आणि तुमच्या घराण्याने चार पिढ्या राज्य करूनही देशाचा काही विकास केला नाही. तेव्हा आम्ही गेल्या चार वर्षांत काय काम केले याचा हिशेब आम्ही तुम्हाला देण्याची गरज नाही, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना सांगून भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी येथे छत्तीसगढमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे बिगूल फुंकले.
छत्तीसगढमध्ये या वर्षांत नंतर विधानसभा निवडणूक व्हायची आहे. त्याआधीच मुख्यमंत्री रमण सिंग यांनी राज्यभर विकासयात्रांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यानिमित्त झालेल्या सभेत राहुल गांधींना वरीलप्रमाणे टोला लगावत शहा यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
अमित शहा म्हणाले, राहुल बाबा, आमच्याकडे चार वर्षांचा हिशेब तुम्ही का मागता? आम्ही तुम्हाला कोणताही हिशेब देण्याची गरज नाही. जेव्हा आम्ही लोकांकडे मते मागायला जाऊ तेव्हा प्रत्येक मिनिटाचा आणि प्रत्येक पैशाचा हिशेब आम्ही त्यांना देऊ.
काँग्रेस पक्षाने ५५ वर्षे व राहुल गांधींच्या घराण्याने चार पिढ्या राज्य केले. त्यामुळे आमच्याकडे चार वर्षांचा हिशेब मागण्याआधी काँग्रेस व राहुल गांधींनी आधी स्वत:कडेच हिशेब मागावा, असे शहा यांनी सूचविले.
आरक्षण अबाधित राहील
निवडणुका जवळ येतील तसा काँग्रेसचा खोेटा प्रचार सुरू होईल. अॅट्रॉसिटी कायदा मोदी सरकार बाद करणार आणि राखीव जागाही मोडीत काढणार, अशा कंड्या पिकविल्या जातील; पण जोपर्यंत भाजपा सत्तेवर आहे तोपर्यंत या दोन्ही गोष्टी आहेत, तशाच अबाधित राहतील, अशी ग्वाही शहा यांनी दिली.