न्यायाधीशाच्या पत्नी आणि मुलावर पोलिसाचा भरबाजारात गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 10:54 PM2018-10-13T22:54:22+5:302018-10-13T22:59:42+5:30
दोन वर्षांपासून न्यायाधीशाच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडणाऱ्या हेड कॉन्स्टेबलचं कृत्य
गुरुग्राम: सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश कृष्णकांत शर्मा यांच्या पत्नी आणि मुलावर गोळीबार झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या दोन वर्षांपासून शर्मा यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यानेच हा गोळीबार केला. या दोघांवर सध्या मेदांता रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती अतिशय नाजूक आहे. या घटनेनंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल महिपाल याला अटक करण्यात आली. त्याला गुरुग्राम-फरीदाबाद मार्गावरुन बेड्या ठोकण्यात आल्या. महिपालनं हा प्रकार का केला, याबद्दल त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती गुरुग्राम पोलीस विभागाचे जनसंपर्क अधिकारी सुभाष बोकान यांनी पीटीआयला दिली.
कृष्णकांत शर्मा यांच्या पत्नी रितू (38) मुलगा ध्रुवसह (18) शॉपिंग करण्यासाठी दुपारी 3 च्या सुमारास सेक्टर 51 मधील आर्केडिया मार्केटला गेल्या होत्या. त्यावेळी कृष्णकांत यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेला हेड कॉन्स्टेबल त्यांच्यासोबत होता, अशी माहिती डीसीपी सुलोचना गजराज यांनी दिली. 'आर्केडिया मार्केटमध्ये गोळीबार झाल्याची माहिती काही स्थानिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं. त्यावेळी रितू आणि ध्रुव रक्ताच्या थारोळ्यात पडले होते,' असं गजराज यांनी सांगितलं.
#WATCH: Wife and son of an additional sessions judge shot at by the judge's gunman in #Gurugram's Sector-49. Both the injured have been admitted to the hospital and the gunman has been arrested. pic.twitter.com/rMqXdYHrxR
— ANI (@ANI) October 13, 2018
महिपाल यांनी रितू आणि ध्रुववर भर बाजारात गोळी झाडली. त्यावेळी बाजारात बरीच वर्दळ होती. रितू आणि ध्रुव औषधे घेण्यासाठी गाडीतून उतरताच महिपालनं त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळ्यांचा आवाज ऐकताच मोठी गर्दी जमा झाली. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये महिपाल रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ध्रुवला कारमधून टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. मात्र यानंतर तो घटनास्थळावरुन कार घेऊन फरार झाला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.