अरेरे! हनिमूनसाठी गोव्याला जायचं होतं पण अयोध्येला घेऊन गेला पती; पत्नीने मागितला घटस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 11:18 AM2024-01-25T11:18:28+5:302024-01-25T11:26:45+5:30
पतीने पत्नीला गोव्याला नेण्याचं आश्वासन देऊन अयोध्येला नेलं. पत्नीने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला.
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पत्नीने पतीपासून घटस्फोट मिळावा म्हणून अर्ज केला आहे. कारण पतीने पत्नीला गोव्याला नेण्याचं आश्वासन देऊन अयोध्येला नेलं. पत्नीने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला असून तेथे सध्या पती-पत्नी दोघांचेही समुपदेशन केले जात आहे. भोपाळच्या पिपलानी भागातील ही घटना आहे.
रिलेशनशिप काउन्सिलर शैल अवस्थी यांच्या म्हणण्यानुसार, दोघांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लग्न केलं होतं. नवरा आयटी इंजिनिअर असून पगारही चांगला आहे. लग्नानंतर पती-पत्नीमध्ये हनिमूनला जाण्याबाबत चर्चा झाली, त्यानंतर पत्नीने परदेशात फिरण्यासाठी जाण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर पतीने आपले आई-वडील वृद्ध असल्याचं सांगत भारतातील कुठल्यातरी पर्यटनस्थळी जाऊ असं म्हटलं, त्यामुळे दोघेही गोव्याला जाण्यास तयार झाले.
पत्नीने आरोप केला आहे की, फिरायला जाण्याच्या एक दिवस आधी पतीने तिला सांगितलं की, आईला मंदिरात जायचं असल्याने ते अयोध्येला जात आहेत. तेव्हा पत्नी त्यांच्यासोबत फिरायला गेली. मात्र तेथून परत आल्यानंतर यावरून त्यांच्यामध्ये जोरदार भांडण झालं आणि पत्नीने घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला.
रिलेशनशिप कौन्सिलर शैल अवस्थी यांच्या म्हणण्यानुसार, पत्नीने हा विश्वासघात असल्याचं म्हटलं आहे आणि आरोप केला आहे की, पती तिच्यापेक्षा आपल्या कुटुंबाला जास्त वेळ देतो, यामुळे लग्नाच्या सुरुवातीपासूनच तिच्याकडे दुर्लक्ष करतो. सध्या पती-पत्नी दोघांचेही समुपदेशन केले जात आहे, जेणेकरून त्यांच्या नातं पुन्हा नीट करता येईल.