गर्भपात करण्यासाठी पतीच्या परवानगीची गरज नाही - सुप्रीम कोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2017 10:09 AM2017-10-28T10:09:20+5:302017-10-28T10:09:27+5:30
गर्भपात करण्यासाठी कोणत्याही महिलेला पतीच्या परवानगीची आवश्यकता नाही, असे सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केले आहे. एका महत्त्वपूर्ण निकालाचा निर्णय देताना कोर्टानं ही बाब स्पष्ट केली आहे.
नवी दिल्ली : गर्भपात करण्यासाठी कोणत्याही महिलेला पतीच्या परवानगीची आवश्यकता नाही, असे सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केले आहे. एका महत्त्वपूर्ण निकालाचा निर्णय देताना कोर्टानं ही बाब स्पष्ट केली आहे. शिवाय, पत्नी गर्भधारणेसाठी तयार नसल्यास पती तिला जबरदस्ती करु शकत नाही, असेही कोर्टानं सांगितले आहे.
पत्नीपासून विभक्त झालेल्या पतीच्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं सांगितले की, कोणत्याही महिलेला मुलाला जन्म देणं किंवा गर्भपात करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. पतीची परवानगी मिळाल्यानंतरच महिलेनं गर्भपाताचा निर्णय घ्यावा, ही बाब गरजेची नाही, सुनावणीदरम्यान कोर्टानं ही बाब स्पष्ट केली आहे.
याचिकाकर्त्यानं पत्नीसहीत तिचे आई-वडील, भाऊ आणि दोन डॉक्टरांवर अवैधरित्या गर्भपात केल्याचा आरोप केला होता. माझ्या परवानगीशिवाय पत्नीनं गर्भपात केला, यावर याचिकाकर्त्यानं आक्षेप नोंदवला होता. यावर पूर्वी पंजाब आणि हरियाण हायकोर्टानंही याचिकाकर्त्यांच्या याचिका फेटाळत गर्भपाताचा निर्णय घेण्याचा अधिकार पूर्णतः महिलेला असल्याचं सांगितले होते.
पंजाब-हरियाणा हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टानंही कायम ठेवला आहे.