पत्नी बड्या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर; हा बेरोजगार झालेला, तिचे अफेअर असल्याचा संशय अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 18:51 IST2025-04-04T18:50:51+5:302025-04-04T18:51:13+5:30
crime news UP: चर्चा करण्यासाठी म्हणून पती-पत्नी त्यांच्या बेडरुममध्ये गेले होते. बंद खोलीत पतीने पत्नीवर हातोड्याने वार केले आहेत.

पत्नी बड्या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर; हा बेरोजगार झालेला, तिचे अफेअर असल्याचा संशय अन्...
नोएडामध्ये नोकरी गमावलेल्या पतीने बड्या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिची हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेवेळी त्यांची मुले आणि पतीचे आई वडील घरातच होते. चर्चा करण्यासाठी म्हणून पती-पत्नी त्यांच्या बेडरुममध्ये गेले होते. बंद खोलीत पतीने पत्नीवर हातोड्याने वार केले आहेत.
पोलीस तपासात असे पुढे आले आहे की, पत्नीचे कोणासोबत तरी अनैतिक संबंध असल्याचा संशय पतीला होता. पती घरीच होता, त्याची नोकरी गेली होती. यामुळे पत्नीच्या कमाईवरच घर चालत होते. ती एका चांगल्या सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होती. बऱ्याचदा ती कामात व्यस्त असायची, फोनवर बोलत असायची किंवा उशिराने घरी यायची. यामुळे पतीला तिचे कुठेतरी बाहेर लफडे सुरु असल्याचे वाटू लागले होते. यातूनच त्यांच्यात वाद होत होते.
खोलीत गेल्यावरही याच विषयावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. वाद वाढला तसा पतीने रागात तिच्या डोक्यावर हातोडा मारला. यात तिचा मृत्यू झाला. पोलीस ठाण्याला फोन करून मुलाने या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी लगेचच त्याच्या घरी धाव घेतली व पत्नीचा मृत्यू झाल्याचे तपासून तिचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवून दिला.
पोलिसांनुसार नोएडातील सेक्टर-१५, सी-१५४ येथे राहणारे नुरल्लाह हैदर (५५) याने त्याची पत्नी आस्मा खान (४२) हिच्या डोक्यावर हातोड्याने वार करून तिची हत्या केली. घटनेची माहिती मृताच्या मुलाने दिली आहे. आरोपी पती नुरल्लाह हैदरला पोलिसांनी अटक केली आहे.
सध्याच्या काळात कौटुंबीक वादांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. मोबाईलमुळे जग जवळ आलेले असले तरी सोशल मीडियामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत आहे. यामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढलेले आहेच परंतू अनैतिक संबंधांच्या संशयातून किंवा खरोखरच संबंध असल्याने गुन्ह्यांतही वाढ झालेली आहे. नुकतीच पिंपात सिमेंट काँक्रीटमध्ये पुरल्याची घटनादेखील अशाच अनैतिक संबंधातून घडली होती. अशा घटनांमुळे आता अनेकांच्या मनात भीती देखील निर्माण झाली आहे. यातून आपलीच पत्नी आपल्यासोबत असे काही तरी करेल असेही आरोप करत पोलिसांची मदत मागणारे पती देखील समोर येत आहेत.