दारूड्या पतीचा खून करून दोन दिवस मृतदेहासोबत झोपली पत्नी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 01:55 PM2017-07-27T13:55:59+5:302017-07-27T14:06:27+5:30
दारूड्या पतीच्या त्रासाला कंटाळून एका महिलेने त्याचा खून केला. धक्कादायक म्हणजे पतीचा मृतदेह या महिलेने दोन दिवस आपल्या घरातच लपवून ठेवला.
नवी दिल्ली, दि. 27 - दिल्लीमध्ये दारूड्या पतीच्या त्रासाला कंटाळून एका महिलेने त्याचा खून केला. धक्कादायक म्हणजे पतीचा मृतदेह या महिलेने दोन दिवस आपल्या घरातच लपवून ठेवला. दोन दिवस याबाबत कोणालाही थांगपत्ता लागला नाही. दोन दिवसांनंतर पतीचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचं तिने शेजा-यांना सांगितलं. पण अंत्यसंस्कारावेळी एका शेजा-याला शंका आली आणि अखेऱ तिचा गुन्हा उघड झाला. चौकशीनंतर पोलिसांनी महिलेला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या कापसहेडा परिसरातील ही घटना आहे. आरोपी शिल्पी अधिकारी (32) ही आपला पती नितीश याच्यासोबत येथे राहात होती. दोघं भाड्याच्या घरात वास्तव्यास होते. शिल्पी एका बॅंकेत साफसफाईचं काम करते. तिच्या पतीला दारूचं व्यसन होतं. नितीश दारू पिऊन शिल्पीसोबत रोज भांडण करायचा, तिला मारहाण करायचा. या त्रासामुळे वैतागलेल्या आरोपी शिल्पीने पतीची हत्या करण्याचा प्लॅन बनवला.
गेल्या शनिवारी तिने संधी साधली. मी पार्टी देते असं सांगून तिने नितीशला दारूची बाटली दिली. बरीच दारू प्यायल्यानंतर नितीश नशेत असल्याचं पाहून तिने संधी साधली. त्याचा गळा दाबून शिल्पीने नितीशची हत्या केली. हत्या केल्यानंतर 48 तास तिने नितीशचा मृतदेह आपल्यासोबतच ठेवला. त्याच्या मृतदेहाच्याच बाजूला दोन दिवस तिने झोपून काढले.
मात्र, दोन दिवसानंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावावी याबाबत तिला काही सुचत नव्हतं. तेव्हा तिने जोरजोरात रडण्याचं नाटक केलं. रडण्याचा आवाज ऐकून शेजारी तेथे पोहोचले. नितीशचा रात्रीतून हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचं तिने त्यांना सांगितलं. शेजा-यांना घरात काय झालं याची काही कल्पना नव्हती त्यामुळे शिल्पी खरं बोलत आहे असं मानून शेजा-यांनी अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली.
नितीशचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानात आणल्यानंतर मात्र शिल्पीचा गुन्हा उघडकीस आला. कारण तेथे उपस्थित एका व्यक्तीचं लक्ष नितीशच्या गळ्यावर गेलं आणि त्याला शंका आली. घटनेचं गांभीर्य ओळखून त्याने त्याचवेळी पोलिसांना माहिती दिली. अंत्यसंस्कार होण्यापूर्वीच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह आपल्या ताब्यात घेतला. शवविच्छेदनातून मृत्यूचं खरं कारण समजल्यानंतर पोलिसांनी शिल्पीला अटक केली.