पत्नीने पतीच्या गुप्तांगावर ओतले उकळते तेल, अनैतिक संबंधांच्या रागातून केले कृत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 12:54 PM2017-12-05T12:54:55+5:302017-12-05T12:57:03+5:30
शशिकलचा पती एम परमेश्वरम (37) या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून त्याला मदुराईच्या राजाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मदुराई - कौटुंबिक वादातून 30 वर्षीय महिलेने पतीच्या गुप्तांगावर उकळते तोल ओतले. तामिळनाडूच्या मदुराई शहरात ही धक्कादायक घटना घडली. पी. शशिकला असे आरोपी महिलेचे नाव असून मदुराई शहर पोलिसांनी तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शशिकलचा पती एम परमेश्वरम (37) या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून त्याला मदुराईच्या राजाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पेशाने रिक्षा चालक असणा-या परमेश्वरमचे विराट्टीपाथून येथे राहणा-या एक महिलेबरोबर सूर जुळले होते. दोघांमध्ये अनैतिक संबंध होते. त्याच रागातून शशिकलाने हे कृत्य केले. शशिकलाला जेव्हा नव-याच्या दुस-या स्त्रीबरोबर असलेल्या प्रेमसंबंधांबद्दल कळले तेव्हा शशिकलाने त्याला जाब विचारला. दोघांमध्ये यावरुन खटके उडायला सुरुवात झाल्यानंतर परमेश्वरमने घरी येणे बंद केले. शशिकलाने एसएस कॉलनी पोलील स्टेशन गाठले. पोलिसांनी परमेश्वरमला बोलवून समज दिली. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तो दुस-या स्त्रीसोबत विराट्टीपाथून येथे रहात होता.
अखेर सर्व बाजूंनी प्रयत्न करुन हरलेल्या शशिकलाने मागच्या आठवयात परमेश्वरमला फोन लावला व त्याच्याशी प्रेमाने बोलून समजूत घातली व त्याला रहाण्यासाठी घरी बोलावले. परमेश्वरमही शशिकलाच्या गोड बोलण्याला भुलला व शनिवारी रात्री घरी पोहोचला. शशिकलाबरोबर गोडी गुलाबीचा संवाद झाल्यानंतर परमेश्वरमला रात्री गाढ झोप लागली.
त्यानंतर शशिकलाने एका पातेल्यात तेल गरम केले व तेच उकळते तेल परमेश्वरमच्या गुप्तांगावर ओतले. या हल्ल्यात परमेश्वरम गंभीररित्या भाजला असून त्याला राजाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कलम 324 आणि 506 या कलमांतर्गत एसएस कॉलनी पोलिसांनी शशिकलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली पण अजून अटक केलेली नाही. या जोडप्याला तीन मुले आहेत.