पत्नी बनवायची रिल्स, युझर्स करायचे अश्लील कमेंट्स, वैतागलेल्या पतीनं उचललं टोकाचं पाऊल, अखेर...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 02:25 PM2024-04-08T14:25:45+5:302024-04-08T14:26:51+5:30
Social Media News: इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या होत असलेल्या वाढत्या प्रसाराबरोबरच सोशल मीडियावर रिल्स शेअर करणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय राहण्याची सवय अनेकांच्या संसारामध्ये मिठाचा खडा टाकत आहे.
इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या होत असलेल्या वाढत्या प्रसाराबरोबरच सोशल मीडियावर रिल्स शेअर करणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय राहण्याची सवय अनेकांच्या संसारामध्ये मिठाचा खडा टाकत आहे. त्यातून काही धक्कादायक घटनाही घडत आहेत. असाच एक प्रकार राजस्थानमधील अलवर येथे घडला आहे. येथे पत्नीच्या सतत रिल्स बनवण्याच्या सवयीमुळे वैतागलेल्या पतीने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
रिल्स बनवून ते सोशल मीडियावर शेअर करण्याची सवय असलेल्या या पत्नीला पतीने रिल्स बनवू नको, असे बजावले होते. तिच्या रिल्सवर युझर्सकडून करण्यात येणाऱ्या अश्लील कमेंटमुळे तो त्रस्त होता. मात्र तिने ते ऐकलं नाही. उलट यावरून त्या दोघांमध्ये वाद होऊ लागले. तसेच पत्नी पतीचं घर सोडून माहेरी निघून गेली. मात्र त्यांच्यातील वाद काही थांबले नाहीत. अखेरीस या महिलेच्या पतीने सोशल मीडियावर लाईव्ह येत अश्लील कमेंट करणाऱ्या लोकांना प्रत्युत्तर दिले. तसेच कुटुंबातील वादाची माहिती देत जीवनाचा शेवट केला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मृत सिद्धार्थ हा रैणी ठाणे क्षेत्रातील नांगलबास गावातील रहिवासी होता. तो दौसा येथील आरोग्य विभागात एलडीसी पदावर कार्यरत होता. दीड वर्षांपूर्वीच वडिलांच्या जागी त्याची अनुकंपा तत्त्वावर भरती झाली होती. सिद्धार्थचा माया नावाच्या तरुणीसी विवाह झाला होता. मायाला सोशल मीडियावर रिल्स शेअर करण्याची आवड होती. तसेच ती इन्स्टाग्राम आणि फेसबूकवर रिल्स शेअर करत असे. तर युझर्स तिच्या रिल्सवर अश्लील कमेंट्स करत असत.
पत्नीचे अशा प्रकारे रिल्स बनवणे पती सिद्धार्थला अजिबात रुचत नव्हते. त्यामधून या दोघांमध्ये खटके उडण्यास सुरुवात झाली होती. वाद वाढल्यावर माया माहेरी निघून गेली होती. तसेच तिने सिद्धार्थविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. सिद्धार्थ मद्यपान करून आपल्याला त्रास देत असल्याचे तिने तक्रारीत म्हटले होते. दरम्यान, या सर्वाला वैतागून अखेर सिद्धार्थने ५ एप्रिल रोजी आत्महत्या केली. या प्रकरणी नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार दिली असून, अधिक तपास सुरू आहे.