श्रीनिवासन यांच्या स्वप्नपूर्तीसाठी पत्नी अमेरिकेत परतणार
By admin | Published: March 2, 2017 12:46 PM2017-03-02T12:46:53+5:302017-03-02T12:53:37+5:30
हैदराबादमधील या तरुणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याची पत्नी सुनैना दुमाला अमेरिकेत जाणार आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - अमेरिकामध्ये कॅनसस शहरात गोळ्या घालून भारतीय इंजिनिअर श्रीनिवास कुचीभोट याची हत्या करण्यात आली होती. हैदराबादमधील या तरुणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याची पत्नी सुनैना दुमाला अमेरिकेत जाणार आहेत. फेसबुकवर काल तिने एक पोस्ट करत याची माहिती दिली. श्रीनिवासन यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहनही तिने केले आहे.
फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये सुनैनाने अमेरिकेत राहत असणाऱ्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ती म्हणाली, अमेरीकामध्ये वर्णद्वेषामुळे होणाऱ्या सतत हल्ल्यामुळे मी श्रीनिवास यांना अमेरिकामध्ये जाण्यास नकार दिला होता. पण ते म्हणाले की तिथे काही गोष्टी चांगल्याही होतात. ट्रम्प सरकार अमेरिकामध्ये होणारा वर्णद्वेष कसा थांबवणार आहेत किंवा या विरोधात कोणतं पाऊल उचलणार आहेत हे मला पहायचं आहे.
दरम्यान, श्रीनिवास कुचीबोटला याची वर्णविद्वेषातून हत्या करण्यात आल्याचा अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात बोलताना निषेध केला. नवीन स्थलांतर नियम हे केवळ देश सुरक्षित ठेवण्यासाठी आहेत असे ते म्हणाले. आम्ही अशा हीन स्वरूपाच्या कृत्यांचा निषेध करतो असे सांगत त्यांनी ज्यू केंद्रांना दिल्या जाणाऱ्या धमक्या व कन्सास गोळीबार घटनेचा उल्लेख केला. जानेवारीत अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांचे संयुक्त अधिवेशनात हे पहिलेच भाषण होते.
22 फेब्रुवारी रोजी कॅनसस शहरात एका अमेरिकी नागरिकाने भारतीय इंजिनीअर श्रीनिवास कुचीभोटला (32) यांची गोळ्या घालून हत्या केली होती. त्यानंतर अमेरिकेतील भारतीयांमध्ये खळबळ माजली गोली. यावेळी आमच्या देशातून चालते व्हा ; अतिरेक्यांनो, असे हल्लेखोर म्हणत होता. माजी नेमबाज एडन पुरिनतोन (51) याने हा गोळीबार केला. त्याचा आणि या इंजिनीअरचा वर्णद्वेषावरुन वाद झाला होता. या हल्ल्यात अन्य एक भारतीय व त्यांचा सहकारी अलोक मदसानी हे गंभीर जखमी झाले आहेत.