"तर मी त्याला 50 हजार रुपये देईन"; पत्नीने WhatsApp वर स्टेटस टाकताच पतीची पोलिसात धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 01:06 PM2024-03-31T13:06:56+5:302024-03-31T13:14:14+5:30
पती-पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
उत्तर प्रदेशातील आग्रा येथे पती-पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वादामुळे आई-वडिलांच्या घरी राहणाऱ्या पत्नीने पतीची ऑनलाईन सुपारी दिली आहे. WhatsApp स्टेटसच्या माध्यमातून पतीची हत्या करणाऱ्याला 50 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. पत्नीचं स्टेटस पाहून पती हादरला आणि त्याने पोलीस ठाणे गाठून मदत मागितली. याशिवाय पत्नीच्या मित्रावरही धमकावल्याचा आरोप आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण आग्राच्या बाह पोलीस स्टेशन परिसरातील आहे. दिलेल्या तक्रारीत तरुणाने म्हटलं आहे की, 9 जुलै 2022 रोजी त्याचं मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील एका तरुणीशी लग्न झालं होतं. लग्नानंतर त्याचे पत्नीशी वाद होऊ लागले आणि ती त्याच वर्षी डिसेंबरमध्ये भिंड येथे आपल्या माहेरी गेली.
पत्नीने भिंड न्यायालयातच पोटगी मागितली. यामुळे पतीला तारीख असेल तेव्हा भिंड येथे जावं लागतं. य़ाच दरम्यान, 21 डिसेंबर 2023 रोजी कोर्टाच्या तारखेवरून परतत असताना सासरच्यांनी जावयाला जीवे मारण्याची धमकी दिली. आता कालच पत्नीने WhatsApp स्टेटसवर पतीला मारण्याची सुपारी दिली आहे.
पत्नीने WhatsApp स्टेटसवर लिहिलं की, मी माझ्या इच्छेविरुद्ध लग्न केले आहे. पतीची हत्या करणाऱ्याला 50 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल. प्रभारी निरीक्षक श्याम सिंह यांनी सांगितलं की, तरुणाच्या तक्रारीनंतर धमकी आणि माहिती तंत्रज्ञान कायदा 2008 च्या कलम 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.