हेलिकॉप्टर अपघातात हुतात्मा झालेल्या कुलदीप राव यांना मुखाग्नी देताना पत्नीचे भावूक उदगार, उपस्थितांना अश्रू अनावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 15:53 IST2021-12-12T15:52:29+5:302021-12-12T15:53:56+5:30
Bipin Rawat Helicopter Crash: ८ डिसेंबर रोजी तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात हुतात्मा झालेल्या सीडीएस बिपिन रावत यांच्यासोबत को पायलट कुलदीप राव यांनाही हौतात्म्य आलं होतं. दरम्यान, Kuldeep Rao यांच्यावर राजस्थानमधील त्यांच्या मूळ गावी घरडाना येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेलिकॉप्टर अपघातात हुतात्मा झालेल्या कुलदीप राव यांना मुखाग्नी देताना पत्नीचे भावूक उदगार, उपस्थितांना अश्रू अनावर
जयपूर - ८ डिसेंबर रोजी तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात हुतात्मा झालेल्या सीडीएस बिपिन रावत यांच्यासोबत को पायलट कुलदीप राव यांनाही हौतात्म्य आलं होतं. दरम्यान, कुलदीप राव यांच्यावर राजस्थानमधील त्यांच्या मूळ गावी घरडाना येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी त्यांचे पार्थिव हवाई दलाच्या विमानाने दिल्लीतून झुंझुनू येथे आणण्यात आले. तसेच तेथील विमानतळावर त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. दरम्यान, कुलदीप यांच्यावरील अंत्यसंस्कारावेळी त्यांच्या पत्नीच्या भावूक उदगारांमुळे उपस्थितांना अश्रू अनावर झाले.
कुलदीप राव यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावाकडे नेताना तिरंगा यात्रा काढण्यात आली. दरम्यान, कुलदीप यांची वीरपत्नी यश्वनी यांनी दिवसभर स्वत:वर ताबा ठेवला. मात्र कुलदीप यांच्यावर अंत्यसंस्कार करताना यश्वनी यांनी तीन वेळा जय हिंद म्हणत आय लव्ह यू, कुलदीप, असे उदगार काढले आणि हंबरडा फोडला. तेव्हा कुटुंबीय आणि उपस्थितांनी त्यांना सावरले. मात्र यावेळी उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले.
हुतात्मा कुलदीप राव यांचे वडील हे नौदलामधून निवृत्त झालेले आहे. सीडीएस बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ते को-पायलट होते. त्यांचे ग्रुप कॅप्टन पी.एस. चौहान होते. दोन वर्षांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. कुलदीप हे सर्वांमध्ये मिळून मिसळून वागणारे होते. त्यांची बहीणसुद्धा नौदलामध्ये सेवेत आहे.
दरम्यान, कुलदीप यांच्या तिरंगा यात्रेवेळी संपूर्ण वाटेवर देशभक्तीपर गीत गायले जात होते. अंत्यसंस्काराच्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. तसेच प्रत्येकजण भावूक झालेला दिसत होता. जनसमुदायाकडून भारत माता की जय चे नारे दिले जात होते.