जंगली हत्तीने महिलेला घरात चिरडून ठार मारले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 06:49 AM2020-06-10T06:49:10+5:302020-06-10T06:49:39+5:30
आरतीबाईच्या पतीला तात्काळ २५ हजार रुपये मदत दिली गेली व राहिलेली ५.७५ लाख औपचारिकता पूर्ण केल्यानंतर दिले जातील, असे चौबे म्हणाले.
कोरबा (छत्तीसगड) : तिहाईपाडा लामणा (जिल्हा कोरबा) खेड्यात जंगली हत्तीने आरतीबाई (३५, रा. पाली, जिल्हा छत्तीसगड) हिला सोमवारी मध्यरात्री चिरडून ठार मारले, असे वन विभागाच्या अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले.
आरतीबाई व तिचा पती तिहाईपाडा लामणात नातेवाईकांकडे आले होते. हत्तीने भिंत तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला व हे जोडपे झोपले होते तिकडे हल्ला केला. तिचा पती घराबाहेर पळाला; परंतु हत्तीने सोंडेने आरतीबाईला पकडले व जमिनीवर आदळून चिरडले, असे वन विभागाचे अधिकारी अश्विनीकुमार चौबे यांनी सांगितले. जखमी अवस्थेत तिला जवळच्या आरोग्य केंद्रात नेण्यात येत असताना तिचा मृत्यू झाला. काही वेळेतच वन विभाग आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी धावले.
आरतीबाईच्या पतीला तात्काळ २५ हजार रुपये मदत दिली गेली व राहिलेली ५.७५ लाख औपचारिकता पूर्ण केल्यानंतर दिले जातील, असे चौबे म्हणाले.
२ जून रोजी पासनमध्ये (जिल्हा कोरबा) हत्तीने एका पुरुषाला ठार मारले होते. दाट जंगल असलेल्या उत्तर छत्तीसगड विभागातील सूरगुजा, कोरबा, रायगढ, जाशपूर आणि कोरिया जिल्ह्यांत हत्ती आणि मानव यांच्यात संघर्षाच्या अनेक घटना घडल्या आहेत.
गेल्या काही वर्षांत झालेल्या या संघर्षात अनेक लोक ठार झाले, तर किती तरी घरे व पिकांची जंगली हत्तींनी नासधूस केली आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षांची मुलगी ठार
च्बहारीच (उत्तर प्रदेश) : कटारनियाघाट वन्यजीव अभयारण्याजवळ असलेल्या धोबियानपूर खेड्यात सोमवारी रात्री बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षांची मुलगी ठार झाली. मुलगी तिच्या घराबाहेर असताना बिबट्याने तिच्यावर हल्ला केला, असे विभागीय वन अधिकारी जी.पी. सिंह यांनी मंगळवारी सांगितले.
च्बिबट्याने मुलीला पकडले होते व तो तिला जंगलात घेऊन जाण्याच्या प्रयत्नांत होता. तेवढ्यात ग्रामस्थ आले व त्यांनी आरडाओरड करताच बिबट्याने तिला तेथेच टाकले व तो जंगलात पळाला, असे सिंह म्हणाले. मुलीचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. ग्रामस्थांना त्यांनी सायंकाळी घराबाहेर पडू नये, असे आधीच सांगण्यात आलेले असल्याचे ते म्हणाले.
४ जून रोजी बिबट्याने दल्लापुरवा खेड्यात तीन वर्षांच्या मुलाला ठार मारले होते व त्याचदिवशी पाथागौडी भागात वन विभागाचा एक कर्मचारी आणि दोन पोलिसांसह सात जणांना जखमी केले होते. नंतर या बिबट्याला वन विभागाने पकडले.