'आप' धक्का बसण्याची शक्यता, अलका लांबा पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 09:39 PM2019-03-16T21:39:24+5:302019-03-16T21:40:42+5:30
आमदार अलका काँग्रेसमध्ये परण्याच्या तयारीत आहेत. यासाठी त्यांनी कोणतीही अट ठेवली नसून काँग्रेसने देखील त्यांना पक्षात घेण्यासाठी विनाअट तयारी दर्शविली आहे.
नवी दिल्ली - देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून पक्षांतराने देखील जोर धरला आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या पक्षात नेत्यांची ये-जा सुरू झाली आहे. यामधून दिल्लीतील आम आदमी पक्ष (आप) देखील सुटला नाही. चांदनी चौक मतदार संघाच्या आम आदमी पक्षाच्या आमदार अलका लांबा यांच्यासह काही आमदार काँग्रेसमध्ये घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत.
आमदार अलका काँग्रेसमध्ये परण्याच्या तयारीत आहेत. यासाठी त्यांनी कोणतीही अट ठेवली नसून काँग्रेसने देखील त्यांना पक्षात घेण्यासाठी विनाअट तयारी दर्शविली आहे. अलका लांबा सर्वप्रथम काँग्रेसमध्ये सामील होणार असून त्यानंतर इतर आमदार काँग्रेसमध्ये घरवापसी करण्याची शक्यता आहे. अलका यांचा काँग्रेस प्रवेश आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का मानला जात आहे.
याआधीच अलका काँग्रेसमध्ये परतणार अशी चर्चा होती, आता त्यांनी 'आप'चे नेतृत्व कमकुवत असल्याचे सांगत आपला इरादा स्पष्ट केला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 'आप' प्रमुख केजरीवाल यांनी २१ डिसेंबरपासून आतापर्यंत अलका यांना भेट दिली नाही. तसेच काही मुद्द्यांवर अलका यांनी मुख्यमंत्री केजरीवाल, मनिष सिसोदिया आणि गोपाल राय यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी त्यांना वेळ देण्यात आला नाही. अलका यांच्यासह इतर आमदारांचे म्हणणे होते की, पक्ष नेतृत्वाने किमान त्यांचे म्हणणे ऐकूण घ्यावे, परंतु असे झाले नाही. त्यामुळे अलका यांच्या काँग्रेसमध्ये परतण्याची शक्यता दाट झाली.
काँग्रेसने आपल्याला बोलवल्यास आपण घरवापसी करू, असे खुद्द अलका यांनी म्हटले आहे. तसेच मी काँग्रेस विचाराची आहे. आपण २० वर्षे काँग्रेसमध्ये जनतेची सेवा केल्याचे देखील त्यांनी सांगितले. दरम्यान अलका या लोकसभा निवडणुकीच्या आधीच काँग्रेसमध्ये सामील होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.