विधानसभा निवडणुका ठरल्याप्रमाणे होतील? राजकीय वर्तुळात चर्चा सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 05:52 AM2021-12-21T05:52:50+5:302021-12-21T05:53:33+5:30
कोविड-१९, ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये होतेय वाढ
व्यंकटेश केसरी, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली असतानाच राजकीय वर्तुळात या निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसार होतील की नाही, याची चर्चा सुरू झाली आहे. याचे कारण आहे ते कोविड-१९ आणि ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये होत असलेली वाढ. उत्तर प्रदेश राज्य दिल्ली, पंजाब आणि उत्तराखंडच्या सीमेवर असले तरी राजधानी दिल्लीपासूनही फार दूर नाही. एकदा निवडणूक वेळापत्रक जाहीर झाल्यावर कोविडसंबंधित आचारसंहितेचे पालन करून घेणे निवडणूक आयोगाला कठीण होणार आहे. पंजाब, उत्तराखंड आणि गोवा विधानसभेची निवडणूक येत्या ६० दिवसांत घेतली जाणे अपेक्षित आहे तर उत्तर प्रदेशमध्ये ती ५ ते ६ टप्प्यांत होईल.
उत्तर प्रदेशमध्ये सत्ताधारी भाजप हा प्रचारात आघाडीवर असून, त्याने जाहिरातींवर कोट्यवधी रूपये खर्च सुरू केला आहे तर आम आदमी पक्ष (आप) आणि काँग्रेसही पंजाबमध्ये मागे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्तर प्रदेशमध्ये दौरे वाढले आहेत. त्यात ते विकास प्रकल्पांचे भूमिपूजन करतात किंवा नव्या प्रकल्पांचे उद्घाटन. या निवडणुकीला त्यांनी किती महत्त्व दिले आहे, हेच यातून दिसते. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी लोकांच्या संपर्कात आहेतच. परंतु, जनतेच्या मनात निवडणुका घेतल्या जाण्याची अनिश्चितता आहे. लॉकडाऊन व निर्बंध लागू केले जातील, याबद्दल ते बोलतात. कारण सरकार आणि त्याच्या यंत्रणा तिसरी लाट हाताळू शकणार नाहीत, याची त्यांना खात्री आहे.
लाटेचा कळस फेब्रुवारीत?
राष्ट्रीय कोविड - १९ सुपर मॉडेल समितीचे प्रमुख विद्यासागर यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले की, “डेल्टाची जागा ओमायक्रॉन विषाणूने प्रभावीपणे घ्यायला सुरूवात केली की, भारतात कोरोना विषाणूची तिसरी लाट निश्चित आहे. ही लाट ओमायक्रॉनमुळे असेल व ती पुढील वर्षाच्या सुरुवातीला येण्याची आणि तिचा कळस फेब्रुवारीत गाठला जाण्याची शक्यता आहे.”