बाबा रामदेव विकत घेणार NDTV?
By Admin | Published: June 5, 2017 01:52 PM2017-06-05T13:52:00+5:302017-06-05T14:10:51+5:30
NDTV या चॅनेलची विक्री करण्याचा प्रस्ताव असून विशेष म्हणजे ही वाहिनी विकत घेण्यास उत्सूक असलेल्या गुंतवणूकदारांमध्ये बाबा रामदेव यांचा समावेश असल्याची चर्चा आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - आर्थिक अडचणीत असलेल्या NDTV या चॅनेलची विक्री करण्याचा प्रस्ताव असून विशेष म्हणजे ही वाहिनी विकत घेण्यास उत्सूक असलेल्या गुंतवणूकदारांमध्ये बाबा रामदेव यांचा समावेश असल्याची चर्चा आहे.
NDTV ही भारतातील अत्यंत प्रतिष्ठेची वृत्तवाहिनी मानली जाते. परंतु गेल्या काही काळापासून ती आर्थिक विवंचनेत आहे. दूरदर्शनवरील वाहिन्या वगळता डिजिटल आणि ई कॉमर्समध्येही एनडीटिव्ही आहे. डिजिटल वगळता दोन्ही अन्य उद्योग हे पूर्णपणे तोट्यात असून, त्यामुळे NDTV काही गुंतवणूकदारांशी चॅनेलच्या विक्रीसंदर्भात बोलणी करत असल्याचे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने एक्सचेंज फॉर मीडिया डॉट कॉमने दिले आहे. या गुंतवणूकदारांमध्ये बाबा रामदेव यांचाही समावेश असून त्यांनी चॅनेलच्या भागधारकांशी प्राथमिक बोलणी केल्याचे वृत्त आहे.
अर्थात, एनडीटिव्हीचे सीईओ केवीएल नारायण राव यांनी मात्र यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. एनडीटिव्हीचे तीन तिमाहीतले उत्पन्न गेल्या वर्षीच्या 396.03 कोटींवरून घसरून यंदा 368.32 कोटी रुपये झाले आहे, यामुळे कंपनीची अवस्था आधीपेक्षा बिकट झाल्याचे स्पष्ट आहे. परिणामी नवीन मालकांचा शोध घेण्यात येत असल्याचे व त्यासाठी गुंतवणूकदारांशी चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
रामदेव बाबांनी पतंजलीच्या माध्यमातून व्यवसाय करण्याची चांगलीच क्षमता सिद्ध केली असल्यामुळे वृत्त प्रसारणाच्या धंद्यातही ते उतरतील का असा प्रश्न उपस्थित झाला आहे, तसेच ते या व्यवसायातही यशस्वी होऊन दाखवतील का अशी चर्चा या क्षेत्रातल्या जाणकारांमध्ये रंगल्या आहेत.
दरम्यान, एनडिटीव्हीच्या एक्झिक्युटिव्ह एडिटर निधी राजदान यांनी मात्र, बाबा रामदेव एनडीटिव्ही विकत घेत असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे.
दरम्यान, बाबा रामदेव यांच्या प्रवक्त्यांनीही या वृत्ताचे खंडन करणारे ट्विट केले आहे. एक्सचेंज फॉर मीडियाच्या वृत्ताला कुठलाही आधार नसल्याचा दावा या ट्विटमध्ये करण्यात आला आहे.Hello people, Ramdev is not buying NDTV. Thank you
— Nidhi Razdan (@RazdanNidhi) June 5, 2017
This is bogus, baseless and unwarranted news that @yogrishiramdev in preliminary talks to buy NDTV @Ach_Balkrishnahttps://t.co/jDhDXlwcNO
— tijarawala sk (@tijarawala) June 5, 2017