प्रदूषणाच्या नावाखाली चिता जाळण्यावरही बंदी घालणार?, त्रिपुराचे राज्यपाल भडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 01:33 AM2017-10-12T01:33:23+5:302017-10-12T01:33:41+5:30

सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली व राजधानी व आसपासच्या परिसरात घातलेल्या बंदीविषयी नापसंती व्यक्त करताना, त्रिपुराचे राज्यपाल तथागत राय यांनी हा निर्णय हिंदुविरोधी असल्याची टीका केली आहे.

 Will the ban on burning of chita in the name of pollution ?, Governor of Tripura Bhadkale? | प्रदूषणाच्या नावाखाली चिता जाळण्यावरही बंदी घालणार?, त्रिपुराचे राज्यपाल भडकले

प्रदूषणाच्या नावाखाली चिता जाळण्यावरही बंदी घालणार?, त्रिपुराचे राज्यपाल भडकले

Next

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली व राजधानी व आसपासच्या परिसरात घातलेल्या बंदीविषयी नापसंती व्यक्त करताना, त्रिपुराचे राज्यपाल तथागत राय यांनी हा निर्णय हिंदुविरोधी असल्याची टीका केली आहे. एवढेच नव्हे, तर हिंदुच्या चिता जाळण्यामुळे प्रदूषण होते, अशी याचिका कोणी न्यायालयात केल्यास, ते अंत्यसंस्कारही रोखणार का, असा सवाल तथागत राय यांनी केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर एखाद्या राज्याच्या राज्यपालांनी अशा शब्दांत टीका करण्याचा हा बहुधा पहिलाच प्रसंग असावा. आधी दहीहंडीवर निर्बंध आणले गेले आणि आता फटाक्यांवर बंदी घालण्यात आली, असे ट्विट करून ते पुढे म्हणाले की, पुरस्कार वापसी करणारी व मेणबत्ती मोर्चा काढणारी गँग चितेमुळेही प्रदूषण होते, अशी याचिका न्यायालयात करेल. त्यांनी या वादात पुरस्कार परत करणारे तसेच मेणबत्ती मोर्चा काढणारे यांनाही निष्कारण खेचले आहे.
निर्भया प्रकरणात दिल्लीत सर्वसामान्यांनीही मेणबत्ती मोर्चे काढले होते आणि त्यात भाजपा कार्यकर्तेही सहभागी झाले होते, याचा त्यांना विसर पडला असावा.
विश्व हिंदू परिषद, स्वदेशी जागरण मंच या रा. स्व. संघाशी संबंधित संघटनांनीही फटाकेबंदीविरुद्ध भूमिका घेतली आहे. त्यात आता त्रिपुराच्या राज्यपालांनीही उडी घेतली आहे. स्वदेशी जागर मंचाने फटाकेबंदीमुळे लाखो लोकांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण होईल, असे म्हटले आहे.
इंग्रजी लेखक चेतन भगत यांनीही न्यायालयाच्या निर्णयावर टीका केली आहे. ते म्हणाले की, फटाक्यांशिवाय दिवाळी कशी साजरी होणार? लहान मुलांच्या हातात यंदा फुलबाजीही दिसणार नाही? फटाक्यांवर प्रदूषणाच्या नावाखाली बंदी घातली जाते, मग बकरी ईद, मुहर्रम व ख्रिस्तमस याबाबत काय भूमिका घेतली जाणार आहे? बकरी ईद व मुहर्रममध्ये तर हिंसा होते, त्याचे काय?ख्रिस्तमस ट्रीवरही बंदी घातली जाणार का?
आदेशात सुधारणा व्हावी-
फटाकेबंदीमुळे दिल्लीतील व्यापारी अस्वस्थ आहेत. त्यांच्याकडे आधीपासूनच फटाक्यांचे साठे आहेत. त्याचे काय करायचे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने आधीच्या आदेशात सुधारणा करून, असलेले फटाके विकण्यास परवानगी द्यावी, अशी याचिका न्यायालयात केली आहे. त्याबाबत न्यायालयाने अद्याप निर्णय दिलेला नाही.

Web Title:  Will the ban on burning of chita in the name of pollution ?, Governor of Tripura Bhadkale?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.