...तर मला विमानतळावरच अटक केली जाईल - असदुद्दीन ओवेसी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 01:50 PM2020-01-13T13:50:21+5:302020-01-13T13:56:52+5:30
'जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 रद्द करून 5 ते 6 महिने झाले आहेत. मात्र, अद्याप त्याठिकाणी इंटरनेट सेवा चालू करण्यात आली नाही.'
हैदराबाद : काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरला विदेशी राजदूतांनी भेट दिली होती. यावरून एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर टीका केली आहे. जर आम्ही काश्मीरचे नाव सुद्धा घेतले, तर आम्हाला हैदराबाद विमानतळावर अटक केली जाईल, असे असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे. याशिवाय, जम्मू-काश्मीरमधील विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयावरून केंद्र सरकारवर निशाणा साधत गेल्या 5 ऑगस्टपासून काश्मीरमध्ये इंटनेट सेवा बंद आहे, असेही असदुद्दीन ओवेसी म्हणाले.
तेलंगणामध्ये होणाऱ्या स्थानिक निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर येथील नारायणपेट जिल्ह्यात शनिवारी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी असदुद्दीन ओवेसी बोलत होते. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करून दुसरी मोठी चूक केली आहे. याआधी पहिली चूक जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला यांना अटक केली होती, असे असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितले.
याचबरोबर, जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 रद्द करून 5 ते 6 महिने झाले आहेत. मात्र, अद्याप त्याठिकाणी इंटरनेट सेवा चालू करण्यात आली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते की, विकास होईल. जसे की आधी काश्मीरमध्ये काहीच होत नव्हते, असे म्हणत असदुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारवर टीका केली.
मोदी सरकारने विदेशी राजदूतांना काश्मीरमध्ये नेले आणि काश्मीरमध्ये शांती असल्याचे त्यांना दाखविले. मात्र, मी जर काश्मीरला जाणार म्हटले की, हैदराबाद विमानतळावर मला सीआयएसएफचे जवान अटक करतील. मी भारतीय संविधानाची शपथ घेतली आहे. पण, मी जम्मू-काश्मीरला जाऊ शकत नाही. परंतू अमेरिका आणि इतर देशांचे राजदूत त्याठिकाणी जाऊ शकतात, असे असदुद्दीन ओवेसी यावेळी म्हणाले.
(संघाकडून माझ्या हत्येचा कट रचला जातोय: ओवेसी)
(सीएएला विरोध भाजपासाठी फायद्याचा, निवडणुकीत 'श्री 420' हरणार - सुब्रमण्यम स्वामी)
(JNU Attack : JNU हिंसाचार प्रकरणी दिल्ली हायकोर्टाची फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि गुगलला नोटीस)