भगवंत मान यांचे मुख्यमंत्रिपद जाणार? केजरीवालांनी बोलविलेल्या आमदारांच्या बैठकीवर मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 13:18 IST2025-02-10T13:17:40+5:302025-02-10T13:18:09+5:30
Punjab Politics: आजची होणारी पंजाब कॅबिनेटची बैठक अचानक रद्द करण्यात आली आहे. ही बैठक आता १३ फेब्रुवारीला घेण्यात येणार असून सर्व आमदारांना मंगळवारी दिल्लीत येण्यास सांगितले आहे.

भगवंत मान यांचे मुख्यमंत्रिपद जाणार? केजरीवालांनी बोलविलेल्या आमदारांच्या बैठकीवर मोठा दावा
दिल्लीत आपचे पतन होताच आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या आमदारांची तातडीची बैठक बोलविली आहे. यामुळे आजची होणारी पंजाब कॅबिनेटची बैठक अचानक रद्द करण्यात आली आहे. ही बैठक आता १३ फेब्रुवारीला घेण्यात येणार असून सर्व आमदारांना मंगळवारी दिल्लीत येण्यास सांगितले आहे. यावरून भाजपाच्या आमदारांनी मोठा दावा केला आहे.
दिल्लीत सरकार गेल्यानंतर आता आपची ताकद पंजाबमध्येच राहिली आहे. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते प्रतापसिंग बाजवा यांनी दिल्ली विधानसभेच्या निकालानंतर केजरीवाल हे पंजाबमध्ये लक्ष घालू शकतात असे म्हटले होते. आपचे अनेक आमदार पक्ष सोडण्याचा विचार करत आहेत. यामुळे आपमध्ये येत्या काळात फेरबदल होताना दिसू शकतो किंवा मध्यावधी निवडणुकांसाठी तयारी केली जाऊ शकते, असा दावा बाजवा यांनी केला होता.
यानंतर ही घडामोड घडत आहे. केजरीवाल लुधियानातून पोटनिवडणूक लढू शकतात, असेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. एका आमदाराच्या निधनामुळे ही जागा रिक्त आहे. अशातच भाजप आमदार मनजिंदर सिंग सिरसा यांनी ट्विट करून मोठी खळबळ उडवून दिली आहे. केजरीवाल हे मुख्यमंत्री भगवंत मान यांना अयोग्य घोषित करून त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवू शकतात, असे यात म्हटले आहे.
महिलांना १००० रुपये देण्याचा वादा पूर्ण करण्यात मान अपयशी आहेत, नशेबाजी रोखण्यास अपयशी ठरले आहेत. तसेच पंजाबची परिस्थिती आणखी खराब केली आहे. आता या साऱ्या गोष्टी ते मान यांच्यावर लादणार आहेत. केजरीवाल एक चांगला माणूस असल्याचे आपच्या आमदारांना बोलायला भाग पाडले जात आहे. त्यांनाच मुख्यमंत्री केले जावे असेही आमदारांच्या तोंडून वदविले जात असल्याचा दावा सिरसा यांनी केला आहे.