400 जागा आल्यानंतर भाजप संविधान बदलणार? रामदास आठवले स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 11:36 AM2024-03-19T11:36:21+5:302024-03-19T11:36:30+5:30
कर्नाटकातील भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी नुकतेच संविधान बदलण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. यासंदर्भात विचारले असता, आठवले बोलत होते.
संविधान बदलण्याचा कुणालाही अधिकार नाही. ज्यांना संविधान बदलायचे असेल त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही. संविधानाच्या प्रिअॅम्बलमध्ये कसल्याही प्रकारचा बदल होऊ शकत नाही. मात्र, नवीन कायदे करण्याचा अधिकार आहे, असे रिपाइं (आ)चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. कर्नाटकातील भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी नुकतेच संविधान बदलण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. यासंदर्भात विचारले असता, आठवले बोलत होते.
ज्यांना संविधान बदलायचं असेल त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही -
सांगली येथे पत्रकार परिषदेत बोलताना आठवले म्हणाले, "मला वाटते हेगडे हे बऱ्याच वेळा दलितांच्या विरोधात अनपेक्षित भूमिका ते मांडत असतात. त्यांच्या भूमिकेचा आणि नरेंद्र मोदी यांचा काही संबंध नाही. त्यांच्या भूमिकेचा आणि भाजपच्या भूमिकेचा कसलाही संबंध नाही. भारतीय जनता पक्षाने आपली भूमिका पूर्णपणे बदललेली आहे. जेव्हा त्यांची भूमिका लिमिटेड होती. तेव्हा त्यांचे 1982 मध्ये दोनच खासदार होते. अटलजींच्या काळात ते 182 झाले, नरेद्र मोदी यांच्याकाळात 282 झाले, नंतर 303 झाले. आता 370 पर्यंत जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे आता हेगडे नेहमीच विपर्यस्त अशा पद्धतीची भूमिका मांडत असतात आणि आता संविधान बदलण्याचा कुणालाही अधिकार नाही, ज्यांना संविधान बदलायचं असेल त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही."
...यामुळे संविधान कुणालाही बदलता येणार नाही -
आठवले म्हणाले, "संविधानाच्या प्रिअॅम्बलमध्ये कसल्याही प्रकारचा बदल होऊ शकत नाही. पण नवीन कायदे करण्याचा अधिकार आहे. जसे, आता महिला आरक्षणाचा कायदा झाला. पार्लमेंटच्या प्रत्येक सेशनमध्ये अनेक विधेयकं येत असतात. त्यात नवीन कायदे करण्याचाही प्रयत्न असतो. त्यात जुन्या कायद्यांमध्ये बदल करण्याचाही प्रयत्न असतो. तेथे बहुमताने विधेयके मंजूर होतात आणि त्याचे कायदे होतात. यामुळे संविधान कुणालाही बदलता येणार नाही."
जेपी नड्डा यांना पत्र पाठवणार -
"हेगडेंच्या भूमिकेचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहीजे अशी आमची मागणी आहे. त्यांनी मागच्या वेळीही दलितांच्या संदर्भात अशीच विपर्यस्त भूमिका मांडली होती. त्यामुळे आमच्या 400 जागा आल्या की आम्ही संविधान बदलणार, अशा पद्धतीची विपर्यस्त भूमिका मांडणे योग्य नाही. त्याचा आम्ही निषेध करतो आणि भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर कारवाई करावी म्हणून आपण जेपी नड्डा यांना एक पत्र पाठवणार आहोत," असेही आठवले म्हणाले.
"मला असे वाटते की सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारची आहे. आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्रामवर एकत्रित आलेलो आहोत. काही मुद्द्यांवर मतभेद असतीलही. पण एनडीएसोबत जॉर्ज फर्नांडीस होते, शरद यादव होते, नितीश कुमार होते, ममता बॅनर्जी होत्या, नवीन पटनायक होते, त्यामुळे मला वाटते की, तसे परिवर्तन समाजात झालेले आहे," असेही आठवले यावेळी म्हणाले.