भाजप प्रवेश वर्मा यांना बनवणार दिल्लीचा नवा मुख्यमंत्री? मिळाले मोठे संकेत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 14:04 IST2025-02-08T14:03:53+5:302025-02-08T14:04:36+5:30
Delhi Election Results 2025 : भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आहे. यामुळे आता प्रवेश वर्मा हे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचे मुख्य दावेदार मानले जात आहे. मात्र, अद्यापपर्यंत ते हे नाकारत आहेत.

भाजप प्रवेश वर्मा यांना बनवणार दिल्लीचा नवा मुख्यमंत्री? मिळाले मोठे संकेत!
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल येत आहेत. हे निकाल आम आदमी पक्षाला धक्का देणार आहेत. आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि त्यांचे जवळचे सहकारी मनीष सिसोदिया यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निवडणुकीत 'आप'ला २३ जागा मिळताना दिसत आहेत. तर भाजपला ४७ जागा मिळताना दिसत आहेत. अर्थात भाजप दिल्लीत सरकार स्थापन करताना दिसत आहे. अशातच, दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण असेल? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
भाजप उमेदवार प्रवेश वर्मा (Pravesh Verma) यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आहे. यामुळे आता प्रवेश वर्मा हे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचे मुख्य दावेदार मानले जात आहे. मात्र, अद्यापपर्यंत ते हे नाकारत आहेत.
नवी दिल्ली जागेची 'जादू' -
महत्वाचे म्हणजे, गेल्या काही निवडणुकांमध्ये नवी दिल्ली जागेवर ज्या उमेदवाराचा विजय झाला, तोच उमेदवार दिल्लीचा मुख्यमंत्री झाला आहे. अरविंद केजरीवाल यांनी २०१३, २०१५ आणि २०२० मध्ये या जागेवरून विजय मिळवला होता आणि दिल्लीचे मुख्यमंत्री झाले होते. २०१३ मध्ये त्यांनी शीला दीक्षित यांचा पराभव केला होता. याच जागेवरून शीला दीक्षितही एकदा निवडून आल्या होत्या. यापूर्वी त्या गोल मार्केट मतदारसंघातून दोन वेळा विजयी झाल्या होत्या आणि मुख्यमंत्रीही झाल्या होत्या. २००८ मध्ये सीमांकनानंतर गोल मार्केट जागेचे नाव बदलून नवी दिल्ली, असे करण्यात आले.
प्रवेश वर्मा यांनी घेतली अमित शाह यांची भेट -
प्रवेश वर्मा यांनी शनिवारी निवडणूक जिंकल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. येथे मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासंदर्भात चर्चा झाली, असे मानले जात आहे. तत्पूर्वी, निवडणूक प्रचारादरम्यान अरविंद केजरीवाल यांनी वर्मा यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप केला होता. तसेच, भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा प्रवेश वर्मा असणार का? असा सवालही विचारला होता.
प्रवेश वर्मा यांनी आपल्या विजयानंतर, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर जय श्री राम लिहिले आहे. तसेच, "दिल्लीत हे जे सरकार येत आहे, ते पंतप्रधानांचे व्हिजन घेऊन येत आहे. मी दिल्लीतील जनतेचे आभार मानतो. हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय आहे. दिल्लीतील जनतेचा विजय आहे," असेही वर्मा यांनी म्हटले आहे.