दाऊदला भारतात आणणारच!
By admin | Published: May 12, 2015 03:14 AM2015-05-12T03:14:54+5:302015-05-12T03:14:54+5:30
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार दाऊद इब्राहिम याचा ठावठिकाणा माहीत नसल्याचे सांगितल्यामुळे विरोधकांचे लक्ष्य बनलेल्या रालोआ सरकारने दाऊद पाकिस्तानमध्येच
नवी दिल्ली : मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार दाऊद इब्राहिम याचा ठावठिकाणा माहीत नसल्याचे सांगितल्यामुळे विरोधकांचे लक्ष्य बनलेल्या रालोआ सरकारने दाऊद पाकिस्तानमध्येच असल्याची पक्की बातमी असल्याचे आणि सरकार त्याला कोणत्याही परिस्थितीत भारतात आणणार असल्याचे सोमवारी लोकसभेत जाहीर केले.
दाऊदबाबत पाकिस्तानवर प्रत्येक स्तरावर दबाव कायम ठेवण्यात येईल असे सांगून गृहमंत्री राजनाथसिंग म्हणाले, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद हा पाकिस्तानमध्येच असल्याची विश्वसनीय माहिती भारताकडे आहे. दाऊदचा पाकिस्तानी पासपोर्ट आणि पाकिस्तानमधील त्याच्या कथित पत्त्यासह त्याच्याशी संबंधित प्रत्येक माहिती भारतातर्फे वेळोवेळी पाकिस्तानला उपलब्ध करून देण्यात येत असते. भारतानेच दाऊदविरुद्ध इंटरपोलच्या मार्फत रेड कॉर्नर नोटीस जारी केल्यामुळे दाऊदचा शोध घ्यावा आणि त्याला भारताच्या हवाली करण्यात यावे, अशी विनंती पाकिस्तानला वारंवार करण्यात येत असते.
पाकिस्तानला पुरेसे दस्तऐवज आणि अन्य साक्षीपुरावे सादर करण्यात आल्यानंतरही पाकिस्तान दाऊदला हूडकून काढण्यात आणि कायदेशीर प्रक्रिया प्रारंभ करण्यात अपयशीच ठरलेला आहे, असे नमूद करून राजनाथसिंग पुढे म्हणाले, दाऊद इब्राहिम हा मुंबईत १९९३ मध्ये घडलेल्या बॉम्बस्फोट मालिकेच्या संदर्भात भारताला हवा आहे. त्याच्या विरुद्ध रेड कॉर्नर नोटीस आणि संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेनेही एक विशेष नोटीस जारी केलेली आहे.
या संदर्भात कोणतेही पाऊल उचलावे लागले तरी चालेल पण आम्ही दाऊदला भारतात आणूनच दम घेऊ, असे राजनाथसिंग यांनी यावेळी जाहीर केले.गृहराज्यमंत्री हरिभाई परथीभाई चौधरी यांनी गेल्या ५ मे रोजी दाऊदबाबत केलेल्या वक्तव्यावरून विरोधकांनी लोकसभेत प्रचंड गदारोळ केला होता. सरकारला दाऊदचा ठावठिकाणा माहीत नाही, असे चौधरी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात म्हटले होते. आपण सोमवारी दाऊदबाबत निवेदन करणार असल्याचे राजनाथसिंग यांनी शुक्रवारीच सांगितले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)