चीनमधील भारतीयांना विमानाने आणणार; कोरोनाग्रस्त वुहानमध्ये २५0 विद्यार्थी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 05:19 AM2020-01-29T05:19:58+5:302020-01-29T05:20:07+5:30
चीनच्या वुहानमध्ये कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला आहे.
नवी दिल्ली : चीनमध्ये राहणाऱ्या २५0 भारतीयांना कोरोना विषाणूची लागण होऊ नये, यासाठी त्यांना परत आणण्यात येणार आहे. त्यांना आणण्याची परवानगी मिळावी, असे पत्र भारताने चीन सरकारला पत्र पाठविले आहे. त्यानंतर, एअर इंडियाचे ४२३ आसनांचे विमान वुहानलो रवाना होणार होईल. चीनमधून आलेल्या नांदेडमधील एका व्यक्तीला देखरेखीखाली रुग्णालयात ठेवले आहे. मात्र, आतापर्यंत भारतात कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही.
चीनच्या वुहानमध्ये कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला आहे. चीनमध्ये आतापर्यंत या विषाणूचा संसर्ग झाल्याने १0६ जण मरण पावले असून, ४,५00 जणांना त्याचा संसर्ग झाला आहे. तिथे २५0 भारतीय असून, त्यापैकी बहुसंख्य विद्यार्थी आहेत. आतापर्यंत १३ देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जागतिक आणीबाणी जाहीर केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चीनमधून थेट वा अन्य देशांच्या मार्गे आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे भारतात स्कॅनिंग सुरू असून, आतापर्यंत ३0 हजारांहून अधिक जणांचे स्कॅनिंग करण्यात आले आहे. केरळमध्ये ४३६ संशयित असून, त्यांच्यावर देखरेख ठेवली जात आहे. त्यातील काही जण चीनमधून तर काही कोरोनाचा संसर्ग झालेल्या देशांतून आले आहेत.
चीनमधून परतलेल्या आठ जणांना तामिळनाडूतील रुग्णालयात चार आठवड्यांसाठी देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. मुंबई व पुणे येथेही सहा संशयित रुग्ण असून, त्यांनाही रुग्णालयात देखरेखीखाली ठेवले आहे. दिल्लीतही तीन संशयित रुग्णांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल केले आहे, तर मध्य प्रदेशच्या उज्जैनमधील रुग्णालयात एक मुलगा व त्याच्या आईला दाखल केले आहे. ते दोघे वुहानहून भारतात आले आहेत. पंजाबमध्येही एका संशयित रुग्णाला इस्पितळात दाखल केले आहे.
ईशान्येकडील राज्यांत अॅलर्ट
आतापर्यंत भारतात कोरोनाची लागण झालेला एकही रुग्ण आढळलेला नाही, पण परदेशांतून येणाºया भारतीयांची संख्या मोठी असल्याने अधिक खबरदारी घेण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून श्रीलंकेनेही चीनमधील नागरिकांना व्हिसा नाकारला आहे. कोरोनाची लागण होऊ नये, म्हणून म्यानमारने देशाच्या सीमा बंद केल्या आहेत. नेपाळमध्येही एक रुग्ण आढळला आहे. भारताच्या ईशान्येकडील राज्ये नेपाळ व चीनला लागून असल्याने तिथे अधिक खबरदारीचा अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.