मोदी, योगींविरोधात घोषणाबाजी कराल, तर जिवंत गाडेन; भाजपा मंत्र्याचं वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 08:41 AM2020-01-13T08:41:04+5:302020-01-13T08:42:28+5:30
सीएएच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीला संबोधित करताना भाजपा मंत्री बरळला
अलीगढ: सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीला संबोधित करताना भाजपा नेते आणि उत्तर प्रदेश सरकारमध्ये राज्यमंत्री असलेल्या रघुराज सिंह यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्यास जिवंत गाडेन, असं सिंह म्हणाले. अलीगढमधील नुमाइश मैदानावर रविवारी सिंह यांचं भाषण झालं.
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य रविवारी एका जनसभेला संबोधित करण्यासाठी अलीगढमधील नुमाइश मैदानात पोहोचले. त्यांच्या आधी रघुराज सिंह यांनी उपस्थितांना संबोधित केलं. अलीगढ मुस्लिम विद्यापीठात घोषणाबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी थेट इशारा दिला. 'मोदी आणि योगी यांच्याविरोधात घोषणाबाजी करणाऱ्यांना मी जिवंत गाडेन,' असं वादग्रस्त विधान सिंह यांनी केलं. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करतानाही सिंह यांची जीभ घसरली. नेहरूंची कोणती जात आहे का? त्यांचं तर कुटुंबदेखील नव्हतं, असं ते म्हणाले.
रघुराज सिंह यांनी अलीगढ विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना थेट धमकी दिली. 'ही मूठभर मंडळी, केवळ एक टक्का असलेली मंडळी, आपल्या देशाचा पैसा वाया घालवत आहेत. देशाशी बेईमानी करत आहेत. मोदी आणि योगी देशाला आणि राज्याला ज्या पद्धतीनं चालवत आहेत, त्याच पद्धतीनं यापुढेही चालवतील. त्यांच्याविरोधात घोषणाबाजी कराल, तर जिवंत गाडेन. हा देश आम्ही चालवू. तुम्ही ऐकून घेण्याची तयारी ठेवा. अन्यथा तुरुंगात टाकू. कोणालाही सोडणार नाही. देशद्रोहाचा गुन्हा दाखल करू. मग तुम्हाला जामीनदेखील मिळणार नाही,' असं सिंह म्हणाले.